पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी कायम ठेवली तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो….

pmc-3-2

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – २०१७ च्या पुणे महानगर पालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी युती – आघाडी न करता, स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी १६२ पैकी तब्बल ९९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र आता महाविकास आघाडीच्या कसब्यातला विजय भाजपमध्ये धडकी भरवणारा आहे. महापालिकेत सत्ता राखण्यासाठी किमान ८७ जागा जिंकणे आवश्यक आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे मागील विजय कायम राखणे भाजपसाठी कठीण असणार आहे

महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी कायम ठेवली तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. चारचा प्रभाग झाला तर त्यांचे ९९ पैकी ५७ नगरसेवक धोक्यात येऊ शकतात. तर ४२ नगरसेवकांना या आघाडीचा कोणताही फरक पडणार नाही., तेथे भाजपची ताकद जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मात्र, आघाडीतील कुरबुरी, जागा वाटपातील वाद, त्यातून होणारी बंडखोरी, स्थानिक समीकरणे, नातीगोती, उमेदवाराची प्रतिमा हे मुद्देही लक्षात घेऊन काही प्रभागात भाजपला दिलासाही मिळू शकतो. पण २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीवरून कोणत्या कोणत्या प्रभागात फटका बसू शकते हे स्पष्ट होत आहे.

तीन दशकांपासून कसब्यावर भाजपचा एकहाती अंमल होता. तीन दशकांहून अधिक काळ कसबा भाजपचा भालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट पुणे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर, महापौरपदी विराजमान असलेल्या मुक्ता टिळक यांनी कसबा निवडणूक जिंकली. मात्र मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसब्यात महाविकास आघाडीचा पहिलाच प्रयोग पोटनिवडणुकीत करण्यात आला. आणि दुरंगी लढत होत, काँग्रेसच्या धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा ११ हजार मतांनी पराभव केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येऊन कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत चमत्कार दाखवला. तीन दशकांपेक्षा अधिक काळ भाजपचा गड राहिलेला कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी खेचून आणला. त्यामुळे बंडखोरी रोखत महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपचा बालेकिल्ला ही भेदू शकतो, असा आत्मविश्वास मिळाला आहे. हीच आघाडी आगामी महानगरपालिकेला कायम राहीली तर भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.

महाविकास आघाडी झाली तर धोक्यात आलेले भाजपचे प्रभाग क्रमांक (अडचणीत असलेल्या नगसेवकांची संख्या) प्रभाग क्रमांक १ धानोरी कळस (३), प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमनाथनगर (४), प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर (३), प्रभाग क्रमांक पुणे विद्यापीठ वाकडेवाडी ७ (४), प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी (४), प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी (२), प्रभाग क्रमांक १० बावधन खु. कोथरूड डेपो (२), प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर ( १), प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना (४), प्रभाग क्रमांक १६ कसबा सोमवार पेठ (१), प्रभाग क्रमांक १७ रस्ता पेठ रविवार पेठ (१),प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ (३), प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर कासेवाडी (१), प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क घोरपडी (१), प्रभाग क्रमांक २३ हडपसर गावठाण सातववाडी (२), प्रभाग क्रमांक २५ वानवडी (२), प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी कौसरबाग (१), प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ पर्वती (२), प्रभाग क्रमांक ३० जनता वसाहत दत्तवाडी (३), प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर (३), प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी (१),प्रभाग क्रमांक ३५ सहकार नगर पद्मावती (१), प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड लोअर इंदिरानगर (१), प्रभाग क्रमांक ३७ अप्पर सुपर इंदिरानगर (१), प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर राजीव गांधी नगर (२), प्रभाग क्रमांक ३९ आंबेगाव दत्तनगर कात्रज गावठाण (१), प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बु. येवलेवाडी (३).नागपूरचाळ फुलेनगर, बावधन कोथरूड डेपो, डहाणूकर कॉलनी, एरंडवणा,शनिवार पेठ, सदाशिव पेठ, सॅलिसबरी पार्क, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, इंदिरानगर या भागातील भाजपला बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. तेथे महाविकास आघाडीचा प्रभाव कमी असल्याचे २०१७ च्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

Latest News