भूषण देसाई यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – बाळासाहेब ठाकरे हेच माझं दैवत आहे. शिवसेना या दोन शब्दांना सोडून माझ्यासमोर तिसरं काही आलं नाही. आठवतही नाही. या राज्यासाठी साहेबांनी स्वप्न बघितलं होतं, ते आज कोण पुढे घेऊन जात असेल, विकास आणि साहेबांचे विचार ते शिवसेना-भाजप युतीचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
बाळासाहेब भवनमध्ये हा पक्षप्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांनी भूषण देसाई यांचे स्वागत केले.आम्ही आधीपासूनच एकत्र काम केलं आहे. त्यांना जवळून बघितलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मी लहान कार्यकर्ता म्हणून काम करतोय. शिंदेंच्या कामामुळे मी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही देसाई यांनी म्हटलं.माझा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे.
त्यांच्या कामाचा वेग, निर्यण, क्षमता मी जवळून अनुभवली आहे, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली आहे. त्यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत आवडल्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी हा निर्णय खूप आधी घेतला होता. हे नवं सरकार स्थापन झालं तेव्हाच मी हा निर्णय घेतला होता, असंही भूषण देसाई यांनी म्हटलं.