पिंपरी चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनीही ST प्रवासाचा आनंद घेतला


महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आणि विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी आज (२० मार्च) आपल्या महिला सहकाऱ्यांसोबत पिंपरी ते लोणावळा असा एसटीने प्रातिनिधिक प्रवास केला.
पिंपरी -चिंचवडमधील वल्लभनगर येथील एसटी आगार ते लोणावळा असा प्रवास या महिला आमदारांनी केला यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर माई ढोरे,स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, निर्मला कुटे,सविता खुळे,वैशाली जवळकर, माधवी राजापुरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, माजी शहराध्यक्षा शैला मोळक, दिपाली धानोरकर, सुप्रिया चांदगुडे आदींनीही आपल्या महिला आमदारांना या प्रवासात साथ दिली
राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या तिकीटात पन्नास टक्के सुट दिल्यापासून एसटीत महिलांची गर्दी ओसंडून वाहत आहे. काही महिला तर ही योजना फसवी तर नाही ना, म्हणून एसटीचा प्रवास करून बघत आहेत. असे असतानाच दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या काही महिला सहकाऱ्यांसोबत मिळून नाशिकमध्ये एसटी प्रवास केला.
यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनीही एसटी प्रवासाचा आनंद घेतल्याची माहिती समोर आली आहे
प्रवासादरम्यान दोन्ही महिला आमदारांनी महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आणि शेवटी त्यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी बोलताना उमा खापरे म्हणाल्या की, महिला मोर्चाची प्रदेशाध्यक्षा असताना यापूर्वी एसटीतून प्रवास केला होता.
तर आपणही साताऱ्याला माहेरी जाताना एसटीने प्रवास केल्याचा अनुभव आमदार जगताप यांनी शेअर केला.तसेच भविष्यातही एसटीने प्रवास करणार असल्याचं त्यांनी सांगितलंयाच वेळी त्यानी एसटी संप सुरु असताना आपले दिवंगत पती लक्ष्मण जगताप यांनी वल्लभनगर आगारातील एसटी कामगारांच्या आंदोलन स्थळी दोनदा भेट दिल्याची आठवण त्यांनी यानिमित्त सांगितली. याशिवाय एसटी कामगारांचे प्रश्न आपण विधानसभेत मांडणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.