समीर वानखेडे यांची नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट….


वानखेडेंची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आलीअंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
दोन वर्षापूर्वी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर झालेल्या पार्टीत वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने बॉलीवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. या कारवाईमुळे समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते.
कोरोना काळातही ड्रग्ज प्रकरणात अनेक धाडी टाकून वानखेडेंनी आपला दरारा निर्माण केला होता. तर आर्यनलाही अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते पण कारवाईनंतर त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. समीर वानखेडे यांनी जाणीवपूर्वक आर्यन खानला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यनला केलेली अटक म्हणजे एक कट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वानखेडेंना नामुष्कीचा सामना करावा लागला होता. इतकेच नव्हे तर वानखेडेंनी नवी मुंबईतील अवैधरित्या मिळवलेल्या बार परवान्याचे प्रकरणही समोर आले.
समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी रविवारी (१९ मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतलीइतकेच नव्हे तर दोघांनीही केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली
. क्रांती रेडकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या भेटीचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे आता भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या आहेत
दरम्यान, दिवाळीमध्ये एका वृत्तपत्राच्या वाशिम आवृत्तीमध्ये समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तेव्हाही समीर वानखेडे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.
आता समीर वानखेडेंनी थेट भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याने आता त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.राजकीय अभ्यासकांच्या मते, वाशीम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वानखेडे हे वाशीम जिल्ह्यातून निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकतात. विशेष म्हणजे वाशिम हा मतदार संघ भाजपचाही बालेकिल्ला आहे. त्यामुळे समीर वानखेडे या वाशिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.