राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात अडकवणे अयोग्य- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – अब्रुनुकसानीच्या खटल्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.राहुल गांधी यांना अशा प्रकारे अब्रुनुकसानीच्या दाव्यात अडकणं चुकीचं आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपखेरीज अन्य पक्ष आणि नेत्यांवर खटले दाखल करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो अतिशय चुकीचा आहे.
आमचे काँग्रेस पक्षाशी भलेही मतभेद असतील, तरीही राहुल गांधी यांना ज्या प्रकारे अब्रुनुकसानीच्या खटल्यात अडकवण्यात येत आहे, ते अयोग्य आहे. जनता आणि विरोधी पक्ष हे प्रश्न विचारणारच, ते त्यांचं काम आहे. आम्ही न्यायव्यवस्थेचा सन्मान करतो, पण या निर्णयाशी आम्ही असहमत आहोत, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे
अब्रुनुकसानीच्या खटल्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांच्या वकिलांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारत न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.
13 एप्रिल 2019 रोजी राहुल गांधी यांची कर्नाटकातील कोलार इथे एक जाहीर सभा झाली होती. या सभेमध्ये ते म्हणाले होते की, ‘ नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी या सगळ्यांची आडनावे सारखी का आहेत ? सगळ्या चोरांचे आडनाव मोदी असते का ?’ त्यांच्या याच विधानामुळे पूर्णेश मोदी या भाजप आमदाराने राहुल यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.