व्यंकटेश (कथा) स्तोत्र ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद…. अन् जिवंत झाले माडगूळकरांचे कथा विश्व !

‘ व्यंकटेश (कथा) स्तोत्र ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

…. अन् जिवंत झाले माडगूळकरांचे कथा विश्व !
…………………..

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः

रेषा आणि भाषांवर प्रभुत्व असलेल्या प्रतिभावंत, ‘ अक्षरलेणे ‘ उभारणारा रसिक, २०० रसाळ कथांचा जन्मदाता … व्यंकटेश माडगूळकर यांचे असे दर्शन पुणेकर रसिकांना आज घडले… निमित्त होते ‘ व्यंकटेश (कथा) स्तोत्र ‘ या कथा अभिवाचन कार्यक्रमाचे !

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ व्यंकटेश (कथा) स्तोत्र ‘ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. बुधवार ,५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम पार पडला.

मराठी कथेचे शिल्पकार व्यंकटेश माडगुळकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कथा साहित्यावर आधारित हा कार्यक्रम होता.संकल्पना ज्ञानदा नाईक यांची होती, निर्मिती,संशोधन-संहिता लेखन आणि बांधणी डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी यांची होती.दिग्दर्शन साहाय्य गौरी देशपांडे यांचे , प्रकाश योजना राम सईदपुरे यांची तर संगीत योजना निखील गाडगीळ यांची होती.गौरी देशपांडे,गिरीश दातार,शर्व गाडगीळ,मोहन माडगुळकर यांनी प्रभावी अभिवाचन केले

माडगूळकरांनी समूहाची , गोतावळयाची, शेत शिवार, पक्षांची गोष्ट सांगीतली.प्रथम पुरुषी निवेदनाच्या या बऱ्याचशा कथा सत्यवचनी वाटत आल्या… आणि अभिवाचनातून उलगडल्या.रसिकांना माणदेशची भाषा गवसत गेली, उमजत गेली.रंग, गंध,नाद यांची अनुभूती भेटीस आली. ‘मारुतीराया ‘, ‘एक प्रसंग ‘, ‘फिरकी ‘अशा अनेक कथा या अभिवाचनात सादर करण्यात आल्या. त्यांना रसिकांनी दाद दिली.

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.

हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५८ वा कार्यक्रम होता .ज्ञानदा नाईक, सु. वा. जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Latest News