इंजिनिअरिंग क्लस्टर मध्ये मोफत ‘सीएनसी ऑपरेटर’ प्रशिक्षण योजना,चिंचवड येथे २० एप्रिल पासून सुरू होणार प्रशिक्षण वर्ग


इंजिनिअरिंग क्लस्टर मध्ये मोफत ‘सीएनसी ऑपरेटर’ प्रशिक्षण योजना
चिंचवड येथे २० एप्रिल पासून सुरू होणार प्रशिक्षण वर्ग
पिंपरी, पुणे (दि. १७ एप्रिल २०२३) – चिंचवड मध्ये इंजिनीअरिंग क्लस्टर येथे
मोफत सीएनसी ऑपरेटर टर्निंग प्रशिक्षण वर्ग २० एप्रिल पासून सुरू होत आहे. इच्छुकांनी सदर सीएनसी ऑपरेटर टर्निंग प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी इंजिनिअरिंग क्लस्टर सेंटर, प्लॉट क्र. ५१, डी -१ ब्लॉक, एमआयडीसी, चिंचवड बर्ड व्हॅली गार्डन समोर पुणे – ४११०१९. मो. ९५९५७१५७०२ / ९६०७६७७३३४ / ७५०७८४३००० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी केले आहे.
अधिक माहिती देताना सागर शिंदे यांनी सांगितले की, मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण वर्ग २० एप्रिल २०२३ पासून सुरु होत आहे.
महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत सुखकर्ता जनरल इंजिनिअरिंग क्लस्टर प्रा. लि. ( म.रा.कौ.वि.सो. चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र) पुणे चिंचवड येथे सीएनसी ऑपरेटर टर्निंगचे प्रशिक्षण वर्ग सुरु होत आहे.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचे उत्तम करिअर घडविण्यासाठी कौशल्य विकासाला पर्याय नसून, सीएनसी मशिनिंगमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सदर प्रशिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे. युवक, युवतींसाठी ही सुवर्णसंधी असून काही अडचणीमुळे अर्धवट राहिलेले तांत्रिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे प्रशिक्षण केंद्रामध्ये ही संधी प्राप्त होत आहे. सीएनसी ऑपरेटर टर्निंगसाठी लागणारे मनुष्यबळ हे अडीच महिन्याच्या एकूण कालावधीमध्ये वर्गामधील प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात कंपनीमध्ये आवश्यक असणारे प्रशिक्षण यांचे संयोजन करून त्यांना नोकरी देण्यासाठी देखील महत्वाची भूमिका प्रशिक्षण केंद्राची असेल. सदर कुशल मनुष्यबळ उद्योगांच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी उत्तम प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम हा उद्योजकांच्या सल्ल्याने व सहभागातून तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या प्रशिक्षणाद्वारे महाराष्ट्रातील युवक, युवतींना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण मिळून ते करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतील. सदर कार्यक्रम पुर्णतः निशुल्क असून या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट १८ ते ४५ वर्षे आहे. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास यांचे प्रमाणपत्र प्राप्त होईल. सीएनसी क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून याचा लाभ घ्यावा.