घोलप विद्यालयात कृतज्ञता सोहळा व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पिंपरी, पुणे ( दि. २६ एप्रिल २०२३) विद्यार्थ्यांनी गुरुचरणी विनम्रपणा ठेवून मोठ्या दिमाखात गुरुजनांचे ऋण व्यक्त करणे म्हणजे आदरणीय शिक्षणमहर्षी कै. बाबुरावजी घोलप यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यास वंदन आहे. आज पर्यंत या संस्थेतून हजारो विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशाचे जबाबदार नागरिक म्हणून देशविकासात योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाचे शिक्षक नेहमीच कौतुक करतात परंतु या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेला हा कृतज्ञता सोहळा आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा सर्वांना प्रेरणादायी आहे असे मत सांगवी येथील बा. रा. घोलप माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब मापारी व्यक्त यांनी केले.
नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप विद्यालयात इयत्ता दहावीच्या सन १९९७-९८ च्या बॅच मधील सुमारे १५० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य मापारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी माजी विद्यार्थी आणि सेवा निवृत्त शिक्षक उपस्थित होते. यावेळी २५ वर्षांनी भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे स्वागत बँड आणि सनई चौघडाच्या स्वरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत केले. पर्यवेक्षिका निवेदिता पोळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. माजी शिक्षक ज्ञानेश्वर कोकडे, संपत लावंड, शरदचंद्र धारूडकर, सुनील वर्पे, मंगला सुर्यवंशी, देववृता वाळुंज, दिनकर पाचे, नलिनी शिंदे, विजय सर्जे, सुजाता चासकर, मंदाकिनी चव्हाण, जयराम साबळे, सुनील पवार, आरती पाटील, प्रतिभा घाडगे, सुरेश बोरकर, सुनिल झेंडे आदी सेवानिवृत्त शिक्षकांना श्रीफळ आणि गाय वासरू ची मूर्ती देऊन विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी मीनाक्षी मिसाळ आणि विलास वाळके या सेवानिवृत्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विलास वाळके म्हणाले की, विद्यार्थी आमच्यासाठी देवघरातली फुलासमान आहेत. अशा कार्यक्रमातून निवृत्त शिक्षकांना स्फूर्ती मिळते. आम्ही विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्काराचे हे फलित आहे असेही वाळके म्हणाले.
माजी विद्यार्थी शशिकांत काटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज आम्ही माजी विद्यार्थी विविध उद्योग व्यवसाय करत असताना यात येणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यासाठी शालेय महाविद्यालयीन काळात शिक्षकांनी केलेले संस्कार उपयोगी ठरत आहेत. त्यामुळेच विविध संकटांवर मात करीत या शाळेचे विद्यार्थी यशाचे शिखर गाठत आहेत. त्यांची प्रेरणा हे विद्यालय आहे याचा मला निश्चितच अभिमान आहे.
आम्हावर उत्तम संस्कार करून शिल्पकारांप्रमाणे जबाबदारी पार पाडणाऱ्या गुरुजनांच्या ऋणात राहणे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सोनी कंपनीचा हँडीकॅम कॅमेरा विद्यालयाला सप्रेम भेट देण्यात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ. जयश्री महाजन, शशी काटे, मोनाली देवकर- जगताप, योगेश गायकवाड, स्वाती गाडेकर – कवितके, स्वाती शिंगाडे – भारती, सुजाता पाटील – निकम, प्रमोद माने, अभय भट्ट, राजु राऊत, प्रभाकर पाटील, राहुल झेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
प्रास्ताविक माजी विद्यार्थीनी डॉ. जयश्री महाजन, सूत्रसंचालन प्रा. संजय मेमाणे आणि आभार
शशी काटे यांनी मानले.