फोटोग्राफी हे नित्यनूतन दालन, परिपूर्णतेचा ध्यास घ्या : सतीश पाकणीकर


फोटोग्राफी हे नित्यनूतन दालन, परिपूर्णतेचा ध्यास घ्या : सतीश पाकणीकर
………………………………..
‘प्रकाशचित्रकला-एक कला,एक व्यवसाय’ विषयावर सतीश पाकणीकर यांनी साधला संवाद
ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटाकडून आयोजन
पुणे :
ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटातर्फे ‘प्रकाशचित्रकला-एक कला,एक व्यवसाय’ या विषयावर ज्येष्ठ प्रकाशचित्रकार(फोटोग्राफर),लेखक सतीश पाकणीकर यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शनिवार ,दि २९ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनी च्या प्रबोध सभागृहात झाला.प्रकाशचित्रकलेचे शिक्षण आणि अनुभवातून समृद्ध झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीकडून कलेचे विभ्रम आणि कंगोरे समजून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटातर्फे मिलिंद संत यांनी प्रास्ताविक केले. सौ. पाकणीकर,डॉ. समीर दुबळे, श्रीनिवास देसाई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
सतीश पाकणीकर म्हणाले, ‘ छायाचित्रकलेला आपण शॅडो ग्राफी म्हणत नाही. त्यामुळे फोटोग्राफीला प्रकाशचित्रकला हाच शब्द योग्य असून तो रुढ केला पाहिजे. हे नित्यनूतन दालन असल्याने , रोज वेगळे क्षण टिपायला मिळत असताना दमायला झाले नाही.
‘फोटोग्राफर जन्म ते मृत्यू अशा जीवनाशी संबंधित सर्व विषयावर काम करत असतो. लग्न, मुंज अशा फंक्शनची फोटोग्राफी करणे, एवढीच फोटोग्राफी नसून इंडस्ट्रीयल , अॅड, ज्वेलरी, फूड, नेचर अशी अनेक क्षेत्रे फोटोग्राफीसाठी उपलब्ध आहेत. पोट्रेट फोटोग्राफीत चेहऱ्याचे,डोळयाचे भाव टिपायला हवेत. पोट्रेट फोटोग्राफी करताना संबंधित व्यक्तीशी फोटोग्राफरचा होणारा संवाद महत्वाचा असतो, असेही त्यांनी सांगितले.
फोटोग्राफी हा छंद होताच, हा छंद हाच व्यवसाय बनल्याने कॅमेरा हे माध्यम बनले, आणि चार दशके क्लिक -क्लिक चा प्रवास सुरु झाला. इंडस्ट्रियल फोटोग्राफी ही आव्हानात्मक असते, सुरक्षिततेची देखील काळजी घ्यावी लागते.
विज्ञान विषयात पदवी घेतलेली असल्याने शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग रोजच फोटोग्राफी करताना होतो, असेही त्यांनी सांगितले.१९८४ पासून मी गायन कार्यक्रमातील गायकांचे फोटो काढले आहेत. ५२५ पेक्षा कलाकारांची ४o हजार हून अधिक फोटो माझ्या संग्रहात आहेत, अशी माहितीही पाकणीकर यांनी सांगितली.
आपण आता सर्वच जण फोटोग्राफर आहोत. मोबाईलद्वारे चांगले फोटो टिपता येतात. फोटोशॉपचे फिल्टर वापरता येतात.
चांगल्या प्रकाशचित्रकलाकारांनी परिपूर्णतेच्या,नावीन्याच्या शोधात राहावे. अविश्रांत काम केले तरी निवृत्ती घ्यावीशी वाटत नाही, असेही शेवटी त्यांनी सांगितले.
घडयाळ कंपनीचे नाव दिसण्यासाठी दहा वाजून दहा मिनिटे !
इंडस्ट्रियल फोटोग्राफी ची उदाहरणे देताना पाकणीकर यांनी अनेक गंमतीजमती सांगीतल्या.घडयाळाचा फोटो दहा वाजून दहा मिनिटे अशी वेळ दाखवणारे फोटो काढले जातात. घडयाळ निर्माण करणाऱ्या कंपनीचा लोगो जो वरती, मध्यभागी असतो, तो दिसावा, हा हेतू असतो. दहा वाजून, दहा मिनिटे वेळ दाखवणारे काटे हे बरोबर ची खूण, सिलेक्ट केल्याची खूण दाखवतात, असेही पाकणीकर यांनी सांगितले. आईस्क्रीम हे फोटोग्राफींच्या दिव्यांमुळे वितळत असल्याने ते आईस्क्रीम स्टुडिओत वेगळे मटेरिअल वापरून कृत्रिमरित्या तयार करावे लागते, आणी तरीही कोणाला ओळखता येत नाही !