महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध करून द्या; आमदार अश्विनी जगताप यांना बहुजन रयत परिषदेचे निवेदन

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

पिंपरी, दि. 2 – सांगवी पोलिस ठाण्यामध्ये महिला पोलिस अधिकारी आणि महिला कर्मचार्‍यांसाठी स्वंतत्र महिला कक्ष, स्वच्छतागृह सुविधेसह नसल्याकारणाने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. महिला कर्मचार्‍यांना शेजारील सोसायटीच्या चेजिंग रूमचा आधार घ्यावा लागत आहे. कायद्याचे रक्षण करणार्‍या या रणरागिणींची कुंचबना होत आहे. या प्रकरणी लक्ष घालून, त्या सुविधा उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांच्याकडे बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षा अ‍ॅड. शुभा पिल्ले यांनी केली आहे.

आमदार अश्विनी जगताप यांची पिंपळे गुरव कार्यालयात भेट घेऊन अ‍ॅड. शुभा पिल्ले यांनी या मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. कायद्याची अंमलबावणी करण्यासह दररोजचे मोर्चे, आंदोलन यावरील बंदोबस्त, रात्रपाळीचे कर्तव्य बजावत असताना महिला पोलिस कर्मचार्‍यांची स्वतंत्र महिला कक्ष, स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत आहे. अनेकदा महिला कर्मचार्‍यांना पुरेशी विश्रांतीही मिळत नाही. त्यामुळे त्यांची मानसिक कुचंबणा होत आहे. सांगवी पोलिस ठाण्यात महिला कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र महिला कक्ष व स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे.

महिला पोलीस कर्मचार्‍यांना बंदोबस्त, ठाणे अंमलदार, वायरलेस, निर्भया पथक, छेडछाड विरोधी पथक अशा विविध जबाबदार्‍या पेलाव्या लागत आहेत. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र काम करावे लागते. अशावेळी महिला पोलिसांची कर्तव्य बजावताना गैरसोय होते. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, चेंजिंग रूम, प्रसाधनगृहाची कमतरता आहे. आपत्कालीन स्थितीत मुख्यालयासह परजिल्ह्यांतून, राज्यातून येणार्‍या महिला कर्मचार्‍यांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या अडचणींचा गांभीर्याने विचार करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून ही समस्या सोडविण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी विनंती अ‍ॅड. शुभा पिल्ले यांनी केली आहे.

Latest News