शिक्षण संस्थांनी इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी झटकल्याने पालिका आयुक्तांकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची तक्रार

पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -काही संस्थांनी चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी झटकल्याने बोपोडी, चिखलवाडी आणि औंध मधील विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे आज (बुधवारी) केली आहे.या भेटीच्या वेळेस आमदार शिरोळे यांचे समवेत माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, आनंद छाजेड आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील चिखलवाडी येथे महापालिकेची माता रमाबाई आंबेडकर शाळा आहे. या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी पुणे महापालिकेने एका संस्थेकडे दिली होती. परंतु, महापालिकेसोबत काम करण्यासाठी इच्छुक नसल्याचे संबंधित संस्थेने कळविल्याने इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग अचानक बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे बोपोडी, चिखलवाडी आणि औंध येथील प्राथमिक शाळांमधून माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे समजताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत यांची भेट घेतली आणि कोणताही विद्यार्थी, विद्यार्थिनी शालेय प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या.

तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशीही आमदार शिरोळे यांनी बोलणे केले. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी आमदार शिरोळे यांना दिले.

Latest News