मविआच्या नेत्यांना देशभरातून प्रतिसाद, तर ईडी सरकारचे घालीन लोटांगण सुरू : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे


पुणे, दि. : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारच्या हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला. त्याला आता देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे ईडी सरकारचे घालीन लोटांगण सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केली.
रविकांत वरपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शरद पवार यांनी महाराष्ट्रात राबविलेल्या प्रयोगाला देशभरातील विविध समविचारी पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. हे नेते महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव, बिहारचे नितिश कुमार, तेजस्वी यादव, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह देशभरातील विविध पक्ष-संघटनांचे नेते-पदाधिकारी हे शरद पवार यांची भेट घेत आहेत. याशिवाय महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या नेत्यांचीही भेट देशभरातील समविचारी पक्षाचे नेते घेत आहेत.
याचाच अर्थ शरद पवार यांनी सुरू केलेला महाविकास आघाडीचा प्रयोगच मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात लढण्याचा पर्याय असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशातल्या राजकारणाचा पॅटर्न बदलायला सुरूवात केली आहे, तर दुर्दैवाने दुसरीकडे खोके सरकारचे दिल्ली आणि गुजरातच्या नेत्यांपुढे मुजरा करणे सुरू आहे, अशी टीकाही रविकांत वरपे यांनी केली.