प्रतिमा उत्कट रंग कथा २३’ चित्र प्रदर्शनाचा समारोप—‘माणसे कलेशी जोडण्याचा संकल्प करू’ :डॉ.समीर दुबळे

*’प्रतिमा उत्कट रंग कथा २३’ चित्र प्रदर्शनाचा समारोप* ————-*’माणसे कलेशी जोडण्याचा संकल्प करू’ :डॉ.समीर दुबळे*

पुणे :ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या – कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ या चित्र प्रदर्शनाचा समारोप रविवारी ११ जून रोजी सायंकाळी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ.गिरीश बापट आणि,ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या अध्यक्ष चेतना गोसावी यांच्या उपस्थितीत झाला.

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष होते.यावेळी बोलताना कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाचे सदस्य आणि ज्येष्ठ गायक डॉ.समीर दुबळे यांनी या प्रदर्शनातील उपक्रमांचा आढावा घेतला

.डॉ. समीर दुबळे म्हणाले,’ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या कला व संस्कृती गटाला कलेच्या माध्यमातून आपल्या मानकानुसार हॅपीनेस इंडेक्स वाढविण्याचे उद्देश आम्ही डोळयासमोर ठेवला आहे. पुण्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेत हे उपक्रम मानाचे स्थान मिळवतील आणि आपले सांस्कृतिक संचित जपण्यासाठी या उपक्रमांची मदत होईल

.माणसं कलेशी जोडली जातील आणि कलाव्यवहार संवेदनशीलतेने समजू शकतील,यासाठी आम्ही प्रयत्न करू’. तत्पूर्वी,रविवारी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे ‘क्रिएटिव्ह इलस्ट्रेशन्स’ हे प्रात्यक्षिक, सायंकाळी ४ वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के यांचे ‘पोर्ट्रेट्स इन एक्रेलिक कलर्स ‘ हे प्रात्यक्षिक झाले

.त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मिलिंद संत,अस्मिता अत्रे,श्रीनिवास देसाई,पूर्णिमा पारेख यांच्यासह अनेकांनी संयोजन केले.

‘प्रतिमा उत्कट- रंगकथा २३’ हे चित्र प्रदर्शन दि.८ ते ११ जून २०२३ या काळात बालगंधर्व कला दालन, पुणे सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले होते. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यामधे ८० हून अधिक कलाकारांनी विविध विषयांवर विविध माध्यमातून काढलेली चित्रे प्रदर्शित केली होती.

ज्येष्ठ कला दिग्दर्शक श्याम भूतकर यांच्या हस्ते ८ जून रोजी सायंकाळी या प्रदर्शनाचे उदघाटन झाले होते.प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांची प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रे आयोजित केली होती.

९ जून रोजी सुरभी गुळवेलकर-साठे यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबरोबर संवाद, १० जून रोजी सकाळी साडे दहा वाजता दीपककुमार शर्मा यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता मिलिंद मुळीक आणि मंजिरी मोरे यांच्याबरोबर संवाद, ११ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी ४ वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के यांचे प्रात्यक्षिक अशा विविध सत्रांना चांगला प्रतिसाद मिळाला

Latest News