39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत :सहाय्य्क आयुक्त निलेश देशमुख


39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील 31 मार्च 2023 अखेर 50 हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या रडारवर आल्या आहेत. 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे.
हा कर वसूल करण्यासाठी सुरुवातीस एसएमएस, कॉलिंगद्वारे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतरही थकीत कर न भरल्यास येत्या पंधरा दिवसांत जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा गर्भित इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
तसेच गत वर्षीच्या शंभर जप्त मालमत्तांचा दोन महिन्यात लिलावही करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून थकीत कर असलेल्या मालमत्ता धारकांच्या कराची वसुली करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
गतवर्षी या विभागाने सुमारे साडेतीनशे कोटी थकीत असलेला कर वसूल केला आहे. तसेच या विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात 1 हजार कोटींचे टार्गेट ठेवले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने कार्यरत आहे.
जुना थकीत कर जास्तीत जास्त प्रमाणात कसा वसूल होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सिध्दी प्रकल्पाअंतर्गत जवळपास शंभर टक्के बिलांचे यशस्वी वाटप झाल्यानंतर पालिकेने आता आपला थकबाकीदार मालमत्तांकडे मोर्चा वळवला आहे
. 1 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या 22 हजार मालमत्ता धारकांना 2023-24 या आर्थिक वर्षाच्या कराच्या बिलाबरोबरच जप्ती पूर्व नोटीसा बजावल्या आहेत. 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे 647 कोटी 62 लाख 40 हजार रुपयांचा कर थकीत आहे. यामधील 1826 मालमत्ता धारकांनी 15 कोटी 71 लाख, 1180 मालमत्ता धारकांनी पार्ट पेमेंट करून 7 कोटी 58 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
आता चौकट -130 जून 2023 अखेर मिशन 400 कोटी2022-2023 मध्ये संपूर्ण कराचा भरणा केलेल्या मात्र यावर्षी अद्यापि मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या मालमत्ताधारकांना कस्टम एसएमएस तसेच IVRS प्रणालीचा वापर करुन प्रिरेकॉर्डेड कस्टम कॉलद्वारे संपर्क केला जाणार आहे. गतवर्षी संपूर्ण कराचा भरणा केलेल्या मालमत्ताधारकांना सवलत योजनेसह कराचा भरणा करणेस प्रवृत्त करणेकामी विभागीय कार्यालयाकडील गटप्रमुख यांचेमार्फत मोबाईल ऍपचा वापर करून टेली कॉलिंग केले जाणार आहे.
शहरातील रहदारीच्या व मोक्याची ठिकाणे निश्चित केलेली आहेत. त्याठिकाणी आकर्षक व लक्षवेधक कंटेंट असलेल्या होर्डींग्ज द्वारे प्रसिध्दी केली जाणार आहे. सर्वाधिक थकबाकीदार असलेले शहरातील भाग निश्चित करुन सदर परिसरात पॅम्पलेट तसेच रिक्षांवर लाऊड स्पिकर द्वारे प्रसिध्दी करणे या सारखे उपक्रम राबवून 30 जून अखेर 400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.