नव्या शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तके निर्मितीच्या मार्गावर – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुणे – नव्या शैक्षणिक धोरणाची पाठ्यपुस्तके तयार होत आहेत, त्यापैकी इयत्ता पहिली व दुसरीची पुस्तके आली देखील आहेत तर लवकरच इयत्ता तिसरी ते 12 वी पर्यंतची येतील, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय शैक्षणिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) नववी, दहावीच्या पाठ्यपुस्तकातील डार्विनच्या उत्क्रांतीचे धडे वगळले गेले ही चूक झाली, या म्हणण्यात तथ्य आहे, असे देखील धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त अॅड. नंदू फडके, राहुल सोलापूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना प्रधान म्हणाले की, भांडारकर संस्था अत्यंत महत्वपूर्ण असे संशोधनात्मक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे काम करते आहे. त्यासाठी सर्वप्रकारची मदत केंद्र सरकार करेल. आपल्या देशाच्या प्राचीन वैभवशाली इतिहासाची नोंद आपण घेतली पाहिजे, ज्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. भारतातील सर्वच प्रदेशातील, राज्या-राज्यांमधील प्राचीन मंदिरे, निसर्गसंपदा यांचा अभ्यास केला तर हजारो वर्षांची असलेली परंपरा आपल्याला संपूर्ण विश्वाशी जोडता येईल, ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन देखील जागोजागी दिसून येतो.
संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले, त्यावेळी बोलतांना फिरोदिया म्हणाले की, पूर्वापार भारतीय संस्कृतीची जीवनमूल्ये एक होती आणि आहेत, धर्म एक आहे, परंपरा वेगवेगळ्या आहेत. परंतू 10व्या शतकापासून सुरू झालेल्या परकीय परधर्मीय आक्रमणांमुळे, त्यांच्या फोडाझोडीमुळे भारतीय समाजात भेदभाव निर्माण होत गेले.
अमृता नातू यांनी भांडारकरमध्ये असलेल्या प्राचीन ग्रंथसंपदेची ओळख मान्यवरांना करुन दिली तर चिन्मय भंडारी यांनी संस्थेची समग्र माहिती चित्रफीतीद्वारे यावेळी करुन दिली. स्नेहा सप्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.