ज्ञान प्रबोधिनी विज्ञान गटाच्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचा समारोप सामूहिक चर्चेतून विज्ञान पुढे गेले पाहिजे : प्रा. वाटवे

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान गटाच्या वतीने पुण्यात आयोजित विज्ञान चित्रपट महोत्सवाचा(सायन्स फिल्म फेस्टिव्हल) समारोप संशोधक प्रा.डॉ. मिलिंद वाटवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल, येथे २ जुलै सायंकाळी ५ वाजता समारोप समारंभ झाला.१ आणि २ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हा महोत्सव झाला. विज्ञानात रुची निर्माण करणारे लघुपट(Short Films), माहितीपट(Documentaries) आणि चित्रपट(Movies) या महोत्सवामध्ये दाखविण्यात आले. त्याच सोबत विषयानुरूप तज्ज्ञांची व्याख्याने, प्रेक्षकांसोबत प्रश्नोत्तरे व चर्चा, विविध कृती अशी सत्रे पार पडली.

विज्ञानात व चित्रपटांमध्ये रस असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्ती, विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले.

सामूहिक चर्चेतून विज्ञान पुढे गेले पाहिजे : प्रा. वाटवे

प्रा. वाटवे म्हणाले, ” दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात.कठीण, छ्ळ करणारे प्रश्न स्वतःला प्रश्न विचारतो, तेव्हा आपण शास्त्रज्ञ होतो. ३० वर्षापूर्वी आम्ही ‘ कट्टा मॉडेल ‘ सुरू केले.आठवडयातून एकदा एकत्र येऊन विज्ञान विषयक गप्पा मारणे, हेच ते मॉडेल आहे. संशोधन करण्यासाठी पी.एच.डी. लागत नाही, शिक्षण लागत नाही. अशिक्षित लोकांनी देखील शोध लावले आहेत.
एकत्रितपणे वैज्ञानिक चित्रपट पाहणे, चर्चा करणे ही अभ्यासनीय प्रक्रिया आहे.एकत्र येण्याला महत्व आहे, सामूहिक चर्चेतून विज्ञान पुढे गेले पाहिजे.त्या दृष्टीने ज्ञान प्रबोधिनीचा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे.

गणेशोत्सवात गृहनिर्माण संस्थांमध्ये विज्ञान प्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.ओम चव्हाण, अनिरुद्ध करमरकर आदी उपस्थित होते.

नचिकेत नित्सुरे यांनी प्रास्ताविक केले. संकेत भंडारे यांनी सूत्रसंचालन केले.

Latest News