पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद: शहराचे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पिंपरी, १४ जुलै: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधला जातो. वैद्यकीय व्यावसायिक शहराच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. वैद्यकीय व्यावसायिकांचे कार्य, त्यांच्या समोरील प्रश्न जाणून घेणे हे शहराच्या विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील जटील होत आहे. महापालिकेच्या वतीने रुग्णालये, दवाखाने या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टर, विविध सवलत योजना यामुळे नागरिकांकडून आरोग्य सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रील तज्ञांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील आरोग्यसेवेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दि. १४ जुलै रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. शेखर सिंह यांचा वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद असे या कार्यक्रमाचे नाव होते.
या कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय व्यावसायिकांनी मा. आयुक्तांशी थेट संवाद साधला. त्यांनी शहरातील आरोग्य सेवा, भविष्यातील वाटचाल, त्या संदर्भात आपली भूमिका, विविध अडचणी इत्यादी विषयांवर आपले विचार व्यक्त केले.
वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद या कार्यक्रमामध्ये पुढीलप्रमाणे विविध विषयांवर माहिती देण्यात आली.
दवाखाने यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाशी चर्चा करून निर्णय घेणेत यावा. महाराष्ट्र प्रदूषण नियामक महामंडळ यांचेसंदर्भात रुग्णालये यांनी एसटीपी कार्यान्वित करणेबाबत पर्यावरण विभाग, एमपीसीबी व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची एकत्रित बैठक आयोजित करून चर्चेद्वारे निर्णय घेणेत यावा
. वैद्यकीय विभागामार्फत कॅटॅरक्ट शस्त्रक्रिया अहवाल ऑनलाईन पद्धतीने संकलित करणेत यावेत. याकामी गुगल शीट/ मोबाईल अॅप तयार करणेत यावे. जैव वैद्यकीय घनकचरा मासिक फीस ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणे बाबत नव्याने कार्यान्वित ऑनलाईन हॉस्पिटल रजिस्ट्रेशन प्रणालीमध्ये योग्य ते बदल करून घेणेत यावेत.
खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचेकरिता बहुउद्देशीय हॉल किंवा ऑफिस उपलब्ध करून देणे बाबत भूमी व जिंदगी विभागाशी पत्रव्यवहार करणेत यावा. महानगरपालिका व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा संवाद सुलभ व्हावा याकरिता व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणेत यावा. यात सर्व वैद्यकीय संघटनाचे अध्यक्ष व सचिव यांचा समावेश करणेत यावा.
जैव वैद्यकीय घनकचरा जमा करणेत येणाऱ्या अडचणींबाबत पास्को संस्थेशी पत्रव्यवहार करून कलेक्शन पॉइंटमध्ये वाढ करता येणे किंवा जीपीएस प्रणालीचा वापर करणे शक्य आहे का हे तपासावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व द्वितीय स्तर रुग्णालयांत आयुर्वेदिक ओपीडी सुरु करणेत यावी.
मनपा कर्मचारी यांचेकरीता भविष्यात इन्शुरन्स योजना सुरु करणेत आल्यास आयुष सेवा देणाऱ्या रुग्णालयांचा समावेश करणेबाबत इन्शुरन्स प्रोव्हायडर्स यांचेसमवेत चर्चा करून निर्णय घेनेत यावा.
सर्व रुग्णालयांनी फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेऊन एनओसी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. याकामी नोंदणीकृत संस्थेकडूनच सदरचे ऑडिट करून घ्यावे. याकामी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत संस्थांची यादी प्रसिद्ध करणेत यावी. तसेच इमारतीचे स्ट्क्चररल ऑडिट करून घेणेत यावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळून आलेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना माहिती कळविणेत यावी. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी झोनल रुग्णालायामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचेकडून लसीकरण,कुटुंब कल्याण, नोटीफायेबल डिसीज ई. बाबतचे अहवाल वैद्यकीय विभागास सादर केले जातात. याकामी एचएमआयएस, आरसीएच पोर्टल व मासिक अहवाल फॉरमॅट तयार करणेत आलेले आहेत. सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी सदरचे अहवाल वेळेत सादर करावेत तसेच अहवाल संकलित करणेत येणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे. महानगरपालिका व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा संवाद सुलभ व्हावा तसेच विविध प्रश्नांवर चर्चेतून तोडगा निघावा याकरिता खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, एमपीसीबी अधिकारी, पास्को अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांची एक दिवसीय कॉन्फोरन्स आयोजित करणेत यावी. या कामी स्मार्ट सिटी टीम द्वारे नियोजन करणेत यावे. या बैठकीस सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.