पुणे शहरातील दहशतवादी हल्ल्याचे दरवेळी ‘कोंढवा कनेक्शन’ कोंढवा पोलिसांनी नागरिकांना केलेले आवाहन


पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुणे शहरातील दहशतवादी हल्ल्याचे दरवेळी ‘कोंढवा कनेक्शन’ दिसून आले आहे.-पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना जेरबंद केले. ते कोंढवा परिसरात मागच्या दीड वर्षांपासून वास्तव्यास होते, असे समोर आले आहे. त्यांच्या सदनिकेत लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये देशविघातक साहित्य, माहिती मिळाली आहे.अधिक तपासासाठी पोलिसांनी घरमालकाला ताब्यात घेतले असता, “हे दहशतवादी चक्क पोटभाडेकरू म्हणून राहत होते. तसेच मूळ भाडेकरूसोबत त्यांनी कोणताही भाडेकरार केलेला नव्हता,’ असे स्पष्ट झाले आहे.
कोथरुड पोलिसांनी वाहन चोरी करताना दोघा संशयितांना पकडले, त्यांचा एक साथीदार फरार झाला. हे दोघेही “एनआयए’च्या यादीतील वॉन्टेड दहशतवादी निघाले. राजस्थान येथील साखळी बॉम्बस्फोटाच्या कटातील ते फरार दहशतवादी आहेत. दरम्यान, 13 फेब्रुवारी 2010 मध्ये कोरेगाव पार्क येथे जर्मन बेकरीत इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने हा बॉम्बस्फोट घडवून आणला.
त्यातील दहशतवादीही कोंढवा परिसरात भाड्याने वास्तव्यास होते. तेथे त्यांनी स्लीपर सेलची कंट्रोल रुमच केली होती. दहशतवादी भाड्याने सदनिका घेऊन तेथे कट रचत असल्याचे आजवरच्या घटनांमध्ये उघड झाले आहे. ही बाब कोंढवा पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी तातडीने नागरिकांना आवाहन करणारे फ्लेक्स, पत्रके आणि व्हिडिओ तयार केले आहेत
. ते ठिकठिकाणी लावण्याबरोबरच समाजमाध्यमांवरही प्रसारित करण्यात येणार आहेत. तर, दुसरीकडे परिसरातील इस्टेट एजंटांनाही याची माहिती पाठविण्यात आली आहे.
कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांच्या प्रकरणी तपास यंत्रणांनी घरमालक अन्वरअली इद्रीस यास चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर त्यास सोडून देण्यात आले.घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात सादर न केल्यास गुन्हा दाखल होईल. सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांनी पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरुला सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये.
तसेच ऑनलाइन भाडेकरुचे व्हेरिफिकेशन केल्यास त्याची एक कॉपी पोलीस स्टेशनला देणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे कोंढवा परिसरात घरमालकांकडून अवाजवी डिपॉझिट मागितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यातून भाडेकरूची अडवणूक केली जात आहे. यामुळे कोणी असे करत असेल, तर त्यावरही कारवाई केली जाईल, असे कोंढव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे म्हणाले.
पुणे शहरात जवळपास 25 टक्के भाडेकरू हे भाडेकरार न करता वास्तव्यास आहेत. ही संख्या काही हजारांमध्ये आहे. यामुळे घरमालकांनी वेळीच सावध होऊन रजिस्टर्ड भाडेकरार करणे आवश्यक आहे. यामुळे अशा देशविघातक व्यक्तींची माहिती वेळीच पोलिसांना मिळेल. ही बाब लक्षात घेऊन कोंढवा पोलिसांनी घरमालकांसाठी तातडीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.ऑनलाइन भाडेकरार केल्यास त्याचे पोलिसांकडून ऑनलाइन व्हेरिफिकेशन होते.
याची एक प्रत पोलीस ठाण्यात देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक घरमालक आणि भाडेकरू पैसे वाचविण्यासाठी भाडेकरार करत नाहीत. मात्र, यामुळे घरमालकच अडचणीत येऊ शकतात. भाडेकरुने पोटभाडे करुन ठेवणेही नियमबाह्य आहे. भाडेकरूने घर सोडताना घराचा ताबा घरमालकाकडे देणे आवश्यक असते, असे असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले.