पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम संथगतीने,.ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : माजी नगरसेवक संदीप वाघेरे

पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम संथगतीने…..ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर येथे सुरु असलेल्या नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरु असून गेली २ वर्षे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्याची आग्रही मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे कडे केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बी.आर.टी.एस.विभागामार्फत पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही.एम. मातेरे इंफ्रा .( इ ) प्रा.ली. यांना दिनांक २२/१२/२०२२ रोजी १८ महिने कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत.
तसेच या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार याकामी मे.ओएस असीस्टीम स्तूप यांची निविदा पूर्व व निविदा पश्चात कामाकरिता नेमणूक करणेत आलेली आहे. सदर कामाची मुदत अनेक महिने पूर्ण होऊन देखील अद्यापपर्यंत ६० टक्के देखील काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
ठेकेदार यांना वारंवार मुदतवाढीची कारणे देत दिनांक ०९/०६/२०२२ रोजी पत्राद्वारे काम पूर्ण करणेस दि.३०/०६/२०२३ पर्यंत भाववाढ / घट सह मुदतवाढ मिळणेची विनंती केलेली आहे. यावर बी.आर.टी.एस.विभागामार्फत मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता.
सदर प्रस्ताव भाववाढ रोखून मान्य करून पुन्हा नव्याने कामास मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबत मी आपणास दिनांक १०/१०/२०२२ रोजी लेखी पत्राद्वारे कळविले होते कि अश्या पद्धतीने मुदतवाढ देऊन बी.आर.टी.एस.विभाग हा जाणीवपूर्वक नागरिकांना वेठीस धरत आहे. सदर विभागाने ठेकेदारास एवढे महिने सवलत का दिलेली आहे या मागचे गौडबंगाल काय आहे?
हा नागरिकांसाठी संशोधनाचा विषय झालेला दिसून येत आहे. या सर्व प्रकरणामध्ये नागरिकांना वेठीस धरून ठेकेदाराचे तसेच सल्लागाराचे हित जोपासण्याचा महापालिकेचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर येत आहे.
ज्या कामास व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच काम नियोजनबद्ध करणेकामी महापालिका यंत्रणा देखील आहे असे काम वेळेवर होत नाही यासारखी शोकांतिका दुसरी असू शकत नाही
. विकासकामे हि नागरिकांच्या सोयीसाठी असतात याचा विसर बहुतेक महापालिकेच्या बी.आर.टी.एस.विभागाला पडलेला दिसून येत आहे. पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम मार्गी लावणेकामी अनेक नागरिकांनी तसेच माझ्या वतीने अनेकवेळा मागणी अथवा निवेदन देण्यात आलेले आहे
. परंतु महापालिका अधिकारी अश्या स्वरूपात नागरिकांना वेठीशी धरून बेजबाबदार ठेकेदारांना पाठीशी घालणार असतील याविरोधात आम्हाला मा. न्यायालयात दाद मागावी लागेल.
तरी आपण नागरिकांना वेठीस न धरता पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश संबधित विभागास देण्यात यावेत तसेच संबधित ठेकेदार व व्यवस्थापन सल्लागार यांचा त्वरित काळ्या यादीत समावेश करण्यात यावा अशी आगृही मागणी मा.नगरसेवक श्री.संदीप वाघेरे यांनी केली.