भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये वैवाहिक समुपदेशन सर्टिफिकेट कोर्स सुरु


पुणे :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे लीगल एड सेंटर आणि ‘फोर सी ‘ज कौन्सिलिंग सेंटर( 4C’s Counselling Centre ) यांच्या संयुक्त विद्यमाने वैवाहिक समुपदेशन सर्टिफिकेट कोर्स चालू करण्यात आला आहे. दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी या कोर्सच्या १० व्या तुकडीचे उद्घाटन झाले.या कोर्समध्ये वैवाहीक समुपदेशन क्षेत्रात करणाऱ्या तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन दिले जात असल्याचे ‘फोर सी ‘ज कौन्सिलिंग सेंटर’चे संस्थापक ,अध्यक्ष डॉ. सागर पाठक यांनी सांगितले. ‘लग्न संस्थेकडे आणि कुटुंबाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन हा कोर्स देतो,आपली नाती सुदृढ करण्यासाठी आणि नात्यात सकारात्मकता आणण्यासाठी प्रत्येकाने हा कोर्स करायलाच हवा ‘,असे मत न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठाच्या प्राचार्या आणि अधिष्ठाता डॉ. उज्वला बेंडाळे यांनी व्यक्त केले.
कौटुंबिक समस्यांची यशस्वी सोडवणूक
लग्न करणं आणि ते टिकवणं सध्याच्या परिस्थितीत खूप अवघड झालं आहे.लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच वेगळं होण्याचे प्रमाण वाढले आहे.कौटुंबिक समस्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे समुपदेशनाची गरज वाढती आहे.अनेक कौटुंबिक समस्या समुपदेशनाद्वारे यशस्वीपणे सोडवता येतात. परंतु त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासपूर्ण समुपदेशन करणे गरजेचे आहे. याकरिता न्यू लॉ कॉलेज भारती विद्यापीठाचे लीगल एड सेंटर आणि ‘फोर सी ‘ज कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वैवाहिक समुपदेशन सर्टिफिकेट कोर्स चालू करण्यात आला. हा कोर्स सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सहभाग यामध्ये वाढला.डॉकटर,वकील,प्रोफेसर,शिक्षक, आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती,गृहिणी ,विद्यार्थी एवढेच नव्हे तर मानसशास्त्र भागात,ज्योतिष क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यामध्ये सहभाग वाढला. या कोर्सची मागणी वाढत होती आणि लॉक डाउन मध्ये अनेक वेगळ्या समस्याही वाढल्या होत्या म्हणून हा कोर्से ऑनलाइन घेण्याचे ठरलं,त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून लोकांना हा कोर्स करता येऊ लागला.हा कोर्स स्वतः साठी ज्यांनी केला,त्यांच्या दृष्टीकोनात प्रचंड बदल झाला.आपल्या व्यवसायात उपयोग व्हावा म्हणून ज्यांनी कोर्से केला,त्यांच्या व्यवसायातही याचा उपयोग झाला.समाजातील वाढत्या मागणीनुसार या कोर्स चे आयोजन करण्यात येते.