डॉ. राजेंद्र जगताप यांनी स्वीकारला दक्षिण कमानच्या प्रधान निदेशक (मुख्य संचालक) पदाचा कार्यभार…


pune_ ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – भारतीय संरक्षण संपदा सेवेतील (IDES) वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र चंद्रकांत जगताप यांनी मंगळवारी (दि. २२) संरक्षण विभागाच्या दक्षिण कमान, पुणे येथे प्रिन्सिपल डायरेक्टर तथा प्रधान निदेशक म्हणून पदभार स्वीकारला. महू कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर दोन वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्यावर डॉ. जगताप यांची दक्षिण कमान पुणे येथे नियुक्ती झाली आहे.
महू कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे काम करत असताना डॉ. जगताप यांनी राबविलेले विविध उपक्रम व प्रकल्पांची दखल घेऊन त्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छता पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री यांच्याकडून शिक्षणासंबंधीचे पारितोषिक, तसेच मध्यप्रदेश राज्य सरकारचा विशेष पुरस्कार देखील देण्यात आले आहे.
डॉ राजेंद्र जगताप यांनी आता पदभार स्वीकारलेल्या दक्षिण कमान प्रधान निदेशालयाच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेले भारतीय सेना, नौदल, हवाई दल, डीआरडीओ, कोस्ट गार्ड अशा विभिन्न संस्थांचे कामकाज याअंतर्गत केले जाते. यामध्ये असणाऱ्या राज्यांत प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तसेच अंदमान, निकोबार, पुदुचेरी, दीव- दमण या ४ केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे.
डॉ. राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त असताना घनकचरा, आरोग्य, पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी विशेष उपक्रम राबविले. तसेच सेवा क वर्गामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात त्यांचे विशेष योगदान होते. पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ असताना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाने (MOHUA) आठ पेक्षा अधिक राष्ट्रीय पुरस्कारांनी डॉ. जगताप यांच्या कामगिरीचा गौरव केला होता. तसेच औंध, बाणेर, बालेवाडी येथे क्षेत्र आधारित व संपूर्ण पुणे शहरासाठी स्मार्ट रोड, वाय-फाय, कमांड अँड कंट्रोल सेंटर असे अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले. ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष तथा सीएमडी असताना सातवा वेतन आयोगाची पुर्तता, तसेच शहरालगत ग्रामीण भाग व ‘पीएमआरडीए’ला बससेवेत समाविष्ट करणे, यांसह अटल बस सेवा, एअरपोर्ट बस आणि १० रुपयांमध्ये बससेवा हे जगताप यांचे निर्णय लोकप्रिय ठरले. पीएमपीएमएलच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी योगदान दिले. महू येथील आपला दोन वर्षाचा कार्यकाळ संपून जगताप पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पुण्यामध्ये रुजू झाले आहेत.