केवळ विकासाचा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवूनच महायुतीत सहभागी:! उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- मोदी यांच्या नेतृत्वाला भारतात तरी पर्याय नाही, असे माझे मत आहे आणि ही वस्तुस्थिती असून ती मान्य करा आगामी काळात मोदींसोबत काम करणार असल्याची ग्वाही देत, आपण विकासाचा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवूनच महायुतीसोबत गेल्याचे अजित पवारांनी बारामतीकरांपुढे स्पष्ट केले
उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीसोबत गेल्यानंतर अजित पवार शनिवारी (ता. 26) प्रथमच बारामतीत आले. त्यांचे बारामतीकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. सर्वकाही अजित पवार अशीच शनिवारी बारामतीची स्थिती होती. लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता व आपल्या भूमिकेमागे बारामतीकर आहेत, हेच आजच्या अजित पवारांच्या सभेने दाखवून दिले
‘आजतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतका दूरदृष्टी असलेला नेता मला तरी दिसत नाही, आज जे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत, त्यांनीही पुन्हा एकदा याचा नीट विचार करावा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या बारामती या होमग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
यामुळे अजितदादांनी अप्रत्यक्षपणे बारामतीच्या होमपिचवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोदींचे नेतृत्त्व मान्य करायचे सुचवले असल्याची चर्चा सुरू झाली.पवार म्हणाले, “
नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात तिस-या क्रमांकावर नेण्याचे उद्दीष्ट निश्चित केलेले असून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व स्वत: मी देशाचं जे पाच ट्रिलियन डॉलरच्या उद्दीष्टांपैकी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा त्यात एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग असेल, हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करत आहोत.
मी आढावा बैठका घेतल्या कारण त्याने मुख्यमंत्र्यांवरील कामाचा भार हलका होतो, स्वत: एकनाथ शिंदे यांनाही यात काहीच आक्षेप नव्हता, मात्र त्याच्याही बातम्या चालविल्या गेल्या. आढावा घेतल्याशिवाय अडचणी समजणार कशा व मार्ग काढणार कसा? असा सवाल त्यांनी केला.
केवळ विकासाचा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवूनच महायुतीत सहभागी झालो, कोणाचाच कोणताही अवमान करण्याचा हेतू नव्हता, असे सांगत जातीय सलोखा राखणे, केंद्राच्या योजना राबविणे व राज्याचा भलं करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, दिगंबर दुर्गाडे, संभाजी होळकर, सचिन सातव, जय पाटील, अविनाश बांदल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.