5000 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा कात्रजमध्ये जप्त…


पुणे : ( ऑनलाइन परिवर्तनाचा सामना ) कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेला सुमारे पाच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा कात्रजमध्ये जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्या पथकाने कात्रज परिसरातून पाच जुलै रोजी टेम्पो ताब्यात घेतला.
टेम्पोत ४ हजार ९७० किलो पनीरचा साठा आढळून आला. त्याचे नमुने बाणेर नॅशनल अॅग्रिकल्चरल अॅन्ड फूड अॅनालेसिस अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यापैकी काही पिशव्यांमधील पनीर भेसळयुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला.
मानवी शरीरास घातक असलेल्या १० लाख रुपये किमतीचा हा भेसळयुक्त पनीरचा साठा नष्ट करण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या सूचनेनुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलिस अंमलदार सुमीत ताकपेरे, महेश पाटील यांनी ही कारवाई केली.