शालेय जीवनातील संस्कार आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात – आयुक्त शेखर सिंह

श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित गुरूकुल शाळेतील उपक्रमांचे आयुक्तांकडून कौतुक!

पिंपरी, ८ नोव्हेंबर २०२३: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
शालेय जीवनातील संस्कार आयुष्याला कलाटणी देणारे ठरत असते, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. चिखली येथील गुरूकुल शाळेला आज भेट देऊन येथील अनोख्या उपक्रमांची माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आयुक्तांचे स्वागत केले. समूहगीते, मानवी मनोरे, नदी प्रदूषणासंबंधी नाटिका, सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके, बासरी – पेटी – तबला वादन, थ्रीडी प्रिंटिंग यांचे सादरीकरण झाले. शाळेतील व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम (IBT) व पर्यावरणपूरक उपक्रम – कंपोस्ट खत निर्मिती, रोपवाटिका, शेती, इकोब्रिक्स सीड बँक याची आयुक्तांनी सिंह यांनी माहिती घेतली. तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्रसंगी, विद्यार्थ्यांचे कौतुक करत आयुक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश कुटुंबियांपर्यंत, मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन सर्वांना केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनवीन उपक्रमांबद्दल देखील आयुक्तांनी सर्वांना माहिती दिली व त्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.

यावेळी, गुरुकुलचे संस्थापक यशवंत लिमये, मार्गदर्शिका प्रज्ञा पिसोळकर, भारती मराठे, संचालिका डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत, मुख्याध्यापक गौतम इंगळे, वैशाली नरवडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून अभ्यागतांना शाळेचा परिसर दाखवला व आभार व्यक्त केले.