राजर्षी शाहू बँकेचे कुटुंबप्रमुख संस्थापक- आबासाहेब शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन


Pune(: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- राजर्षि शाहू सहकारी बँक लि.चे संस्थापक अध्यक्ष प्र. दि. उर्फ आबासाहेब शिंदे यांचे मंगळवारी वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शिंदे यांचा जन्म ४ जून १९३७ला पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावात झाला होता. त्यांचे शालेय, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. १९६१ मध्ये त्यांनी अमेरीकेतील कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीमधून बी. एस. केमिकल इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त केली
राष्ट्रसेवा दलाच्या संस्काराचा पगडा आणि राजर्षि शाहू महाराजांच्या विचाराची छाप त्यांच्यावर होती. त्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी एक बहुजन समाजाची बँक असावी या उद्देशाने त्यांनी शहरात राजर्षि शाहू सहकारी बँकेची स्थापना ४० वर्षापूर्वी केली.
बँकेच्या आता मुख्य कचेरीसह १५ शाखा आहेत.बँकेच्या ४० वर्षाच्या इतिहासामध्ये तब्बल २५ वेळा त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषविले.
त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली बँकेच्या अनेक निवडणूका बिनविरोध पार पडल्या. याशिवाय १० वर्ष श्री शिवाजी मेमोरीअल सोसायटीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेवर अनेक वर्ष नियामक मंडळ सदस्य, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय स्थानिक समितीचे अध्यक्ष, शिवाजी मराठा सोसायटी कारभारी मंडळाचे अध्यक्ष व सहसचिव, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्ष,अरण्येश्वर मंदिराचे ट्रस्टी, छत्रपती राजाराम सहकारी गृहरचना सोसायटीचे २१ वर्ष अध्यक्ष, स्पन पाईप लघुउद्योग महाराष्ट्र राज्य या लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष अशी महत्वाची पदे त्यांनी भूषविली.
शिंदे यांनी जीवनभर सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, बँकींग क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये केलेल्या चांगल्या, पारदर्शक कामाची दखल घेत अनेक संस्थानी त्यांना सहकाररत्न, सहकारमहर्षिसारख्या पुरस्कारांसह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.