शिक्षण विभागात ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करणे चुकीचे- सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर

rahul-kolhatkar

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने 32 प्राथमिक शाळांमध्ये 32 क्रीडा शिक्षक हे मानधन तत्वावर घेण्याऐवजी ठेकेदारी पद्धतीने एका संस्थेच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्तपद सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

प्रशासकीय राजवट असल्याने शहरात अनेक विकासकामे नव्याने होतील तसेच रस्ते, स्वच्छता, नागरी प्रश्न यांना केंद्रस्थानी ठेवून कामे मार्गी लागतील अशी आशा होती. तसेच कार्यक्षम आयुक्त असल्याने महापालिकेतील चुकीच्या कामांना लगाम घातला जाईल असे वाटत होते.पण उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांना सोबत घेऊनच ठेकेदारी चालवली जात आहे.

कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेत 2 वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. आयुक्त शेखर सिंह व अधिकारी पूर्ण कारभार पाहतात.क्रीडा शिक्षक भरतीला आमचा विरोध नाही. पण मानधन तत्वावर भरण्याऐवजी शिक्षण विभागात ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करणे चुकीचे आहे.

याकरिता शिक्षण विभागाच्या वतीने 1 कोटी 10 लाख 88 हजार रुपयाची निविदा काढण्यात आली.त्या निविदा प्रक्रियेत 3 संस्थांनी सहभाग घेतला.

त्यापैकी 2 संस्था पात्र ठरल्या तर मे. किंडर स्पोर्टस यांची 5 टक्के जादा दर असलेली 1 कोटी 16 लाख 42 हजार 400 रुपयांची निविदा लघुत्तम दराची ठरवून त्यांना काम देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.

शाळांमध्ये यापूर्वी मानधन तत्वावर शिक्षक भरती केली जात होती. पण शिक्षक भरतीच ठेकेदार पद्धतीने करून पैसे कमविण्याचा नवा पायंडा महापालिका शिक्षण विभागात पडला जात असल्याने करदात्या नागरिकाच्या मनात एक या प्रकाराबाबत शंका निर्माण होत आहे

.क्रीडा शिक्षक भरती करताना ठेकेदारी पद्धतीचा अवलंब का केला गेला ? नेमका ठेकेदारी पद्धतीचा फायदा कोणाला होणार आणि शिक्षणासारख्या पवित्र कार्यात अशा चुकीच्या कामाचा / पद्धतीचा शिरकाव आयुक्त का करत आहेत, असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

Latest News