राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सामूहिक स्तोत्र पठण 1100 मातांमध्ये 300 पुणेकर मातांचा समावेश

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ११०० मातांनी हनुमानचे जन्मस्थान असलेल्या अंजनाद्री पर्वत पायथ्याशी पंपा सरोवर येथे हनुमान तांडव स्तोत्राचे सामूहिक पठण केले.त्यात ३०० पुणेकर मातांचा समावेश होता.फाउंडेशन ऑफ हॉलिॅस्टिक डेव्हलपमेंट (एफ एच डी ) च्या संस्थापिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे ,संस्थेच्या राष्ट्रीय प्रमुख सौ.माधवी बोधनकर,संतोष केलोजी,आमदार जनार्दन रेड्डी आदी उपस्थित होते.
देशातील पाच पवित्र सरोवरांपैकी एक म्हणून पंपा सरोवर प्रसिद्ध आहे.
असे ख्यात आहे की याच स्थळी देवी पार्वतीने श्री शिवाच्या आराधनेसाठी नृत्य केले होते. या ऐतिहासिक पावन स्थळी देशभरातील अनेक राज्यातून ११०० च्या वर महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या . सूर्योदयाच्या समयी सुरू झालेला हा समापन सोहळा जवळपास एक तास चालू होता.

लयबद्ध पद्धतीने सादरीकरण

श्री हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झाला. सरोवराच्या बाजूने सर्व महिला हातात दीप घेऊन सुंदर रचनेमध्ये उभ्या होत्या. गंगावती येथील किष्किंधा प्रदेशामध्ये अंजनाद्री पर्वत, पंपा सरोवर अशी स्थळे रामायण कालीन म्हणूनही विख्यात आहेत.

असे म्हटले जाते की सरोवराच्या समोरच असलेल्या पुरातन गुहेमध्ये रामभक्त शबरीने प्रभू श्रीरामाच्या प्रतीक्षेमध्ये वास्तव्य केले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या समापनाचे उद्दिष्ट मातांना आपल्या मातृत्व शक्तीची जाणीव करून देणे हे आहे असे फाउंडेशन ऑफ हॉलिॅस्टिक डेव्हलोपमेंट (एफ एच डि) च्या संस्थापिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी नमूद केले.

देशभरातील सर्व इच्छुक महिलांनी संस्थेला ऑनलाइन संपर्क केला आणि हनुमान तांडव स्तोत्र पठणाचे प्रशिक्षण त्यांना दररोज संध्याकाळी ऑनलाइन देण्यात आले. प्रत्येक महिलेला स्तोत्र मुखोदगत तर होतेच; शिवाय सर्वांनी ते एकसुरात लयबद्ध पद्धतीने सादर केले हेच या प्रशिक्षणाचे यश आहे असे स्वागत समितीचे सदस्य संतोष केलोजी (गंगावती) यांनी सांगितले.
गंगावती तालुका येथील आमदार जनार्दन रेड्डी या कार्यक्रमासाठी सपत्नीक उपस्थित होते.

वसुधैव कुटुम्बकम या उद्देशाने आणि मातृशक्तीच्या जागृती साठी एफ एच डि संस्थेने यापूर्वीही शिवतांडव, रामतांडव आणि काली तांडव या स्तोत्रांच्या समापनाचे आयोजन केले आहे. भविष्यातही या प्रकारचे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे असे संस्थापिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

Latest News