पुणे पोलिस आयुक्तालयातील ४१ पोलिस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक आणि ७० उपनिरीक्षकांच्या बदल्या…


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )
लोकसभा निवडणुका पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात, यासाठी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले होते. त्यानुसार एका महसुली जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झालेले आणि २१ डिसेंबर २०२३नंतर कार्यकारी पदावर नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
. यात पुणे पोलिस आयुक्तालयातील ४१ पोलिस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक आणि ७० उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांत वाहतूक उपायुक्ताची बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात काढलेल्या नियमावलीचा पुणे पोलिसांना मोठा फटका बसतो आहे.
या नियमावलीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयातील १३१ निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, त्या बदल्यात केवळ ३१ निरीक्षक दाखल झाले आहेत. त्यामुळे सुमारे शंभर निरीक्षक-उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत.
अनेक पोलिस ठाण्यांत गुन्हे निरीक्षक नेमण्यात आलेले नाहीत; तसेच वाहतूक शाखेच्या विविध विभागांतही प्रभारी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतून बदली करण्यात आलेल्या निरीक्षकांची वर्णी लागणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेत निरीक्षकांच्या नेमणुका होणे बाकी आहे.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरीक्षकांच्या नेमणुका करताना कसरत करावी लागणार आहे.‘नार्कोटिक्स’ला निरीक्षकांची प्रतीक्षागुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षात केलेली कारवाई विक्रमी ठरली आहे. चालू वर्षात हजारो कोटी रुपयांचे मेफेड्रोन पकडल्यानंतर शहर आणि परिसरात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे दिसून आले. ही कारवाई करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकांना वरिष्ठ निरीक्षकांची प्रतीक्षा आहे.‘वाहतूक’साठी स्वतंत्र उपायुक्त नाही
अधिकारी पदे बदली होऊन गेलेले नव्याने दाखल
निरीक्षक ४१ १७
सहायक निरीक्षक २० ७
उपनिरीक्षक ७० ७
निरीक्षकांअभावी रिक्त विभाग
– गुन्हे शाखेचे युनिट चार आणि पाच.
– अमली पदार्थविरोधी पथक १ आणि २.
– आर्थिक गुन्हे शाखेत आठ निरीक्षकांच्या जागा रिक्त.
शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच मेट्रो, उड्डाणपूल अशा विविध विकासकामांमुळेही वाहतुकीला मोठा फटका बसत आहे.
या परिस्थितीत वाहतुकीची परिस्थिती सुधारण्यासाठी, प्रभावी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी असणे गरजेचे आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते.
मुख्यालय विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्याकडे वाहतूक शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. त्यामुळे वाहतुकीकडे लक्ष देताना त्यांना कसरत करावी लागत आहे