देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात….आचारसंहिता लागू पुणे, मावळ, शिरूर ला 13 मे ला मतदान


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
– संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.तसेच लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. कोणत्या राज्यात किती टप्प्यात मतदान होईल, निकाल कधी लागेल, देशातील एकूण मतदार किती? स्त्री आणि पुरुष मतदार किती? नव मतदार किती? संवेदनशील मतदारसंघ किती? या सर्वांची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे.
सात टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून
देशात 97 कोटी मतदार
आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
मतदारसंघ मतदान कधी
नंदुरबार 13 मे
धुळे 20 मे
जळगाव 13 मे
रावेर 13 मे
बुलडाणा 26 एप्रिल
अकोला 26 एप्रिल
अमरावती 26 एप्रिल
वर्धा 26 एप्रिल
रामटेक 19 एप्रिल
नागपूर 19 एप्रिल
भंडारा-गोंदिया 19 एप्रिल
गडचिरोली-चिमूर 19 एप्रिल
चंद्रपूर 19 एप्रिल
यवतमाळ – वाशिम 26 एप्रिल
हिंगोली 26 एप्रिल
नांदेड 26 एप्रिल
परभणी 26 एप्रिल
जालना 13 मे
औरंगाबाद 13 मे
दिंडोरी 20 मे
नाशिक 20 मे
पालघर 20 मे
भिवंडी 20 मे
कल्याण 20 मे
ठाणे 20 मे
मुंबई-उत्तर 20 मे
मुंबई – उत्तर पश्चिम 20 मे
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) 20 मे
मुंबई उत्तर मध्य 20 मे
मुंबई दक्षिण मध्य 20 मे
दक्षिण मुंबई 20 मे
रायगड 7 मे
मावळ 13 मे
पुणे 13 मे
बारामती 7 मे
शिरुर 13 मे
अहमदनगर 13 मे
शिर्डी 13 मे
बीड 13 मे
उस्मानाबाद 7 मे
लातूर 7 मे
सोलापूर 7 मे
माढा 7 मे
सांगली 7 मे
सातारा 7 मे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग 7 मे
कोल्हापूर 7 मे
हातकणंगले 7 मे
गुन्हेगारांची माहिती संकेतस्थळावर- मतदानाबाबतची कोणतीही माहिती हवी असल्यास ती वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
10.5 लाख पोलिंग स्टेशन- 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे. जगभरातही यंदा निवडणुका होत आहेत. आम्ही स्वतंत्र आणि निपक्ष निवडणुका घेणार आहोत. दीड कोटी कर्मचारी निवडणुकीची कामे करणार आहेत. तर 55 लाखाहून अधिक ईव्हीएम मशीन तयार ठेवण्यात आल्या आहेत. देशात 10.5 लाख पोलिंग स्टेशन असणार आहेत. या निवडणुकीसाठी 1.5 कोटी पोलिंग अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात असतील, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
85 लाख नव्या महिला मतदारांची नोंद- यंदा महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 85 लाख नव्या महिला मतदारांची नोंद झाली आहे. देशात 82 लाख मतदार 85 वर्षावरील आहेत. 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. तसेच 1 एप्रिल रोजी ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.