PCMC: इंद्रायणी नदीचे पाणी दोन दिवसात स्वच्छ करा अन्यथा.. : तुषार कामठे यांचा इशारा

पालखी प्रस्थानाच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी..

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- शुक्रवार दि. 28 जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज व शनिवार दि. 29 जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान अनुक्रमे देहू व आळंदी येथून होणार आहे, त्यासाठी लाखो वारकरी भाविक भक्त पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पाणी अत्यंत दूषित असून त्यात स्नान केल्यास वारकरी बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी येत्या दोन दिवसात इंद्रायणी नदीचे पाणी वापरण्यायोग्य करा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्याचे मुखमंत्री तथा पर्यावरण मंत्री एकनाथ शिंदे, पिंपरी चिंचवडचे प्रभारी आयुक्त राहुल महिवाल व पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पत्राद्वारे कामठे यांनी मागणी केली आहे.

सदर पत्रामध्ये म्हंटले आहे की, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील समस्त वारकरी संप्रदाय पवित्र इंद्रायणी नदी पात्रात स्नान करण्यासाठी तसेच पाणी प्राशन करण्यासाठी आतुर असतो, आपल्या धार्मिक आस्थेनुसार नद्यांना अत्यंत पवित्र व जीवनदायिनी समजले जाते, पण दुर्दैवाने कित्येक वर्षांपासून इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी चिंचवड शहर परिसरातील सांडपाणी, विषारी रसायने थेट सोडले जात असल्याने इंद्रायणी नदीचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक बनले असून स्नान करण्यासाठी सुद्धा हे पाणी वापरले जाऊ शकत नाही, या पाण्यात स्नान केल्यास किंवा हे पाणी प्राशन केल्यास वारकरी बांधवांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

म्हणूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, पुणे जिल्हा प्रशासन, व राज्य शासन पर्यावरण विभाग यांना आम्ही सदर पत्राद्वारे विनंती करतो की आपली सर्व यंत्रणा कामाला लावून येत्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच 27 जून 2024 पर्यंत इंद्रायणी नदीचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित व पिण्यायोग्य करावे, नदीत सोडले जाणारे सांडपाणी, विषारी रसायने, कचरा आदी समस्यांवर तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी. वारकरी बांधवांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची व्यवस्था सुनियोजित करावी. अन्यथा 28 जून रोजी आम्ही तीव्र जनआंदोलन करणार आहोत. याची आपण दखल घ्यावी, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

Latest News