CAA हा काळा कायदा’ ब्रिटीशांच्या रौलेट act सारखा – उर्मिला मातोंडकर

प्रतिनिधी

पुणे : ब्रिटीशांच्या ‘रौलेट अॅक्ट’सारखा ‘सीएए’ हा काळा कायदा आहे. हा कायदा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर गरिबांच्या विरोधात आहे. तो आम्हाला मान्य नाही. हा वणवा सुरु असताना शांत राहून चालणार नाही. आपला देशच आपल्याला ओळखू येणार नाही, इतका बदलू देऊ नका, असे मत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने व्यक्त केले.

महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त कोथरूड गांधी भवनात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बिशप थॉमस डाबरे,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड , महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी उपस्थित होते. सरकार आपल्याला कागद मागत असेल तर त्यांना मध्यावधी निवडणूक घेऊन जनादेशाचा कागद मागा. ज्यांना अक्कल नसते ते नक्कल करतात, हे हिटलरची नक्कल करीत आहेत. हिटलरला आत्महत्या करावी लागली आणि राख झाली.४० कोटी लोक या कायद्यामुळे देशोधडीला लागतील,असा इशारा डॉ.कुमार सप्तर्षी यांनी दिला. हा लढा केवळ मुस्लिमांचा नाही, सर्वांचा आहे, तो बंधुतेने लढला पाहिजे. वेड्यांना सत्तेपासून दूर केले पाहिजे. राज्य सरकार बदलले तरी पोलिसांची कार्यशैली बदलली पाहिजे. सभेत हिंसा होऊ नये, याची जबाबदारी गांधी भवन ने घ्यावी, असे पोलिसांनी पत्र देणे हे हास्यास्पद आहे.

Latest News