पर्यावरण व्याख्यानमालेत नूतन कर्णिक यांचे व्याख्यान उलगडले छोटया कीटकांचे सौंदर्य आणि कार्य …


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणारी ‘जीविधा’ ही संस्था तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा बायोडायव्हर्सिटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण व्याख्यानमालेतील तिसऱ्या दिवशी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी मित्रकिडा फाऊंडेशन फॉर इन्सेक्ट रिसर्च अँड कंझरव्हेशन च्या संस्थापक नूतन कर्णिक यांचे ‘सौंदर्य छोट्या कीटकांचे ‘ या विषयावर व्याख्यान झाले . या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला .श्री.दुधाट यांनी स्वागत केले.’जीविधा’ संस्थेच्या वृंदा पंडित यांनी प्रास्ताविक केले .
‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या विषयावरील ही व्याख्यानमाला दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान दृकश्राव्य सभागृह,गरवारे महाविद्यालय (कर्वे रस्ता) येथे रोज होत आहे.व्याख्यानमालेची वेळ रोज सायंकाळी ६.३० ते ८ अशी असणार आहे.व्याख्यानमालेचे १६ वे वर्ष असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
नूतन कर्णिक यांनी छोटया कीटकांचे सौंदर्य, कार्य यांची रंजक माहिती दिली.त्या म्हणाल्या,’४८ कोटी वर्षांपूर्वी कीटक पृथ्वीवर दिसू लागले. पंख असलेले आणि पंख नसलेले कीटक असे प्रकार आढळतात. उत्क्रांतीमुळे त्यांच्यात बदल होत गेले. झाडापेक्षाही अधिक संख्येने कीटक पृथ्वीवर आहेत.
लेडी बर्ड बिटल हा मित्र किडा बागेतील हानिकारक गोष्टी, बग खातो, तो मित्र कीटक आहे.काजव्यांच्या २०० प्रजाती आहेत. पाणथळ जागांची गुणवत्ता काजव्यांच्या उपस्थिती वरून ठरवता येते. मात्र, त्यांना कॅमेरा, बॅटरी च्या प्रकाशापासून, कीटक नाशकापासून वाचवले पाहिजेत. रस्त्यांवरून ते पहावेत पण जंगलात घुसू नये. अन्यथा त्यांचे पुनरुत्पत्ती होणार नाही. फ्रॉग हॉपर सारखे कीटक मानवी थुंकी सारखे स्त्राव पानांवर सोडतो. चिलटे ही त्रासदायक असली तरी जनुकीय अभ्यासासाठी ती उपयोगी पडतात. अगदी सुरुवातीला अंतराळ प्रवासात देखील त्यांना पाठवले गेले आहे. किरणोत्सर्ग (रेडिएशन)चा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहून मानवाला किती त्रास होईल, याचा अंदाज बांधला जातो.ब्ल्यू बॉटल फ्लाईज या माशी मुळे मानवी मृतदेहाला किती दिवस झाले, हे फॉरेन्सिक तपासात कळते.
फिग वास्प या कीटकांमुळे अंजिराचे परागीकरण होते.
शेणकिडे हे निसर्गाचे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात,बिया चां प्रसार, खत निर्मिती करतात. चंद्राच्या प्रकाशातदेखील ते काम करतात, असेही नूतन कर्णिक यांनी सांगितले.
भारती बारहाते, राहुल मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आगामी व्याख्याने
गुरुवार , 26 सप्टेंबर रोजी
‘परागीकरणात कीटकांची भूमिका ‘ विषयावर ईशान पहाडे यांचे व्याख्यान होणार आहे .
शुक्रवार , 27 सप्टेंबर रोजी ‘चला करूया फुलपाखरांशी ओळख’ विषयावर रजत जोशी यांचे व्याख्यान होणार आहे .
शनिवार , 28 सप्टेंबर रोजी
‘सुक्ष्मांचे छायाचित्रीकरण ‘
विषयावर सुधिर सावंत यांचे व्याख्यान होणार आहे .
निसर्ग साखळीत सर्व सजीव जातींचे महत्व एकसारखे असते.दुर्दैवाने लहान आकाराच्या सजीवांकडे सजगतेने पाहिले जात नाही.’जीविधा’ व गरवारे महाविद्यालयाच्या बायोडायव्हर्सिटी विभागतर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत छोट्या आकाराच्या जीवसृष्टीची माहिती तज्ज्ञांकडून ऐकण्याची संधी मिळेल.