शेतक-यांच्याही नाईट लाईफचा विचार करा, विरोधीपक्ष नेते फडणवीस

परभणीतील कृषी संजीवनी राज्यस्तरीय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते
प्रतिनिधी
परभणी- मुंबईतील श्रीमंतांच्या नाईट लाईफची चिंता करणा-या राज्य सरकारने शेतक-यांच्या नाईट लाईफचा विचार करावा, असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी(दि.7) परभणीत लगावला. वीज भारनियमनामुळे रात्री- बेरात्री पिकांना पाणी देणा-या शेतक-यांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले.
संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजीत कृषी संजीवनी राज्यस्तरीय महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी माजीमंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, आ.मेघना बोर्डीकर, माजी आ.मोहन फड, माजी आ.विजय गव्हाणे,माजी आ.गजानन घुगे, कुलगुरू अशोक ढवण,आयोजक भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आदीची उपस्थिती होती.
देशातील कोणत्याही भागापेक्षा मराठवाड्यातील शेतकरी सर्वाधीक आव्हानांना तोंड देतो. मागील वर्षी दुष्काळ तर यंदा अतिवृष्टीने शेतकरी कोलडमला गेला आहे. कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढली पाहिजे. त्यातुनच शाश्वत शेती विकास साधता येईल. असे नमुद करताना आज ही मराठवाड्यातील शेतक-यांवर रात्री-बेरात्री पिकांना पाणी देण्याची वेळ येते. मात्र सरकार मुंबईच्या नाईट लाईफचा विचार करते. शेतक-यांच्याही नाईट लाईफची चिंता या सरकारने करावी, असा टोला ही फडणवीस यांनी लगावला. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना रद्द केल्यास तो मराठवाडयावरील सर्वात मोठ्या अन्याय ठरणार असल्याचे नमुद करीत या सरकारची इच्छाशक्तीच नसल्याने या योजनेला स्थगिती देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ही फडणवीस यांनी केला. तसेच, संघर्ष करू, रस्त्यावर उतरू. संघर्षाची गरज नसेल तर आमच्या समन्वयाने ही योजना मार्गी लावा, असा सल्ला ही फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला.