प्रतिमाह 12 लाख रुपये भाड्याच्या इमारतीवरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे : पुण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आज अजित पवारांनी केलं. या इमारतीचं दर महिन्याचं भाडं 12 लाख रुपये आहे. यावरुन अजित पवारांनी आपल्या भाषणात वारंवार नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे या देखील उपस्थित होत्या.
‘झोपु’चं हे कार्यालय जास्त काळ इथे राहू देणार नाही. हे कार्यालय सरकारी जागेत हलवावं. 12 लाख रुपये प्रति महिना भाडं मोजून हे कार्यालयं घेतलं हे बरोबर नाही. या कार्यालयासाठी वर्षाला दीड कोटी रुपये भाडं जाणार आहे. एवढ्या किमतीत एसआरएचं स्वतःचं कार्यालय तयार होईल. करदात्यांचा पैसा असा उधळण्याचं कारण नाही, असं अजित पवारांनी म्हटलं.
हे अलिशान कार्यालय काकडे बिझनेस सेंटरमधे सुरु करण्यात आलं आहे. हे बिझनेस सेंटर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या मालकीचं आहे. एसआरएच्या या वातानुकूलित कार्यालयासाठी या बिझनेस सेंटरचा अख्खा पाचवा मजला भाड्याने घेण्यात आला आहे. खरं तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं पुण्यात आधीच एक कार्यालय आहे, तरीही हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

