महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीवर प्रेम करणाऱ्या आणि प्रचंड मोठा विजय मिळवून देणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे आभार- माधुरी मिसाळ


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भाजपच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी आव्हान निर्माण केले होते. येथे महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याऐवजी काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. मात्र, मिसाळ यांनी तब्बल ५० हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. मागील विधानसभा निवडणुकीत मिसाळ आणि कदम यांच्यात लढत झाली होती. यंदा दोघी पुन्हा आमनेसामने होत्या. गेल्या वेळी मिसाळ यांना ९७ हजार १२ तर कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. यावेळी बागुल यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची मते फुटण्याची शक्यता होती. गेल्या वेळी या मतदारसंघात ४९.०५ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.२६ टक्के मतदान झाले. यंदा मतदानाच्या टक्क्यात सुमारे सहा टक्के वाढ झाली. हा वाढलेला मतटक्काही महत्त्वाचा ठरलाभाजप आणि माधुरी मिसाळ यांच्यासमोर हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान होते. याच वेळी मागील वेळचा पराभव विजयात परिवर्तित करण्याचे आव्हान अश्विनी कदम यांच्यासमोर होते. या मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे वारे होते. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला आबा बागुल यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत आहे.