‘आदिअष्टकम’ नृत्य कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे-(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘आदी अष्टकम’ या आदि शंकराचार्यांच्या रचनांवर आधारित कथक नृत्य सादरीकरण कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता,उपस्थित रसिक बहारदार सादरीकरणाने मंत्रमुग्ध झाले. ज्येष्ठ नृत्य गुरू शमा भाटे, अरूंधती पटवर्धन ,रसिका गुमास्ते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.हा कार्यक्रम ‘नाद रूप’,शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि डॉ.उषा आर.के.(मॉस्को ) यांनी प्रस्तुत केला. रविवार,दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात झाला.वर्षा दासगुप्ता,अस्मिता ठाकूर,मुकेश गंगाणी,अमीरा पाटणकर,अवनी गद्रे हे देशभरातील नामवंत कथक नृत्य कलाकार या सादरीकरणात सहभागी झाले. त्यांना चारूदत्त फडके (तबला), शुभम खंडाळकर (गायन), यशवंत थिटे (हार्मोनिअम), पार्थ भूमकर (पखवाज), आर्य ताडफळे (सतार), ईशा नानल, श्रेया, श्रध्दा, वैष्णवी (पढंत) यांनी साथसंगत केली.

अवनी गद्रे यांनी ‘शारदा भुजंगाष्टकम् ‘ ने कार्यक्रमाची सुरुवात केली. या मधे शारदा मातेचे स्तवन करण्यात आले.आमिरा पाटणकर यांनी ‘यमुनाष्टकम् ‘ सादर केले. हिंदू धर्मामध्ये यमुना नदी आस्था आणि विश्वासाचे प्रतिक आहे. यमुना नदीला जीवनदायिनी असेही म्हणतात.वर्षा दासगुप्ता (दिल्ली ) यांनी ‘गंगाष्टकम् ‘ प्रस्तुत केले. श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. ‘ कालभैरवाष्टकम् ‘ श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. मुकेश गंगाणी यांनी कालभैरवाष्टकम् प्रस्तुत केले.गुरु अष्टकम् या अष्टकमध्ये आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्व काय आहे हे नृत्यातून सादर करण्यात आले. अस्मिता ठाकूर यांनी हे नृत्य सादर केले.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.समृद्धी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कलाकारांचा सत्कार ज्येष्ठ नृत्य गुरू शमा भाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३२ वा कार्यक्रम होता.

Latest News