व्हीनस आर्ट फाउंडेशन आणि शिक्षण मंडळ यांच्या वतीने पीसीएमसी डिझाईन एज्युकेशन फेअरचे आयोजन


पिंपरी, पुणे (२२ जानेवारी २०२५ ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मागील पंधरा वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये डिझाईन क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या व्हिनस आर्ट फाउंडेशनच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ, दिशा सोशल फाउंडेशन यांच्या सहयोगाने “पीसीएमसी डिझाईन एज्युकेशन फेअर २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन चिंचवड, ऑटो क्लस्टर येथे शुक्रवारी (दि.२४ जानेवारी) सकाळी ११ वाजता, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आमदार शंकर जगताप, महेशदादा लांडगे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती जगन्नाथ उर्फ नाना शिवले, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व या एज्युकेशन फेअर मध्ये सहभाग घेतलेल्या विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती व्हिनस आर्ट फाउंडेशनच्या चेअरमन अपूर्वा पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना व पालकांसह सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. शुक्रवार २४ जानेवारी ते रविवार २६ जानेवारी सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत विविध कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डिझाईन क्षेत्रातील भारतातील नामवंत विद्यापीठाचे विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना बारावीनंतर डिझाईन क्षेत्रातील शिक्षण संधी या विषयावर मार्गदर्शन करतील. याचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्हीनस आर्ट फाउंडेशनचे विश्वस्त संतोष निंबाळकर यांनी केले आहे.