पुष्पक एक्सप्रेस: संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुष्पक एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईला येत असताना तिला कॉशन ऑर्डर म्हणजे काम सुरू असल्याने स्टॉप घेतला होता. पण कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला गाडी थांबवली तर सूचना देऊन प्रवाशांना कळतं गाडी थांबली. काम सुरू आहे. पण ही गाडी स्टेशनजवळ न थांबवता जंगलात थांबवली. त्यामुळे काही प्रवाशी खाली उतरले. एका बाजूला ब्लॉक होता. दुर्देवाने दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. पुष्पक एक्सप्रेस गाडीने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवासी खाली उतरले. परंतु, विरूद्ध बाजूने येणाऱ्या रेल्वे लाईनवरून येणार्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत या ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेबद्दल माहिती समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. फडणवीस म्हणाले की,जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ते पुढे बोलताना म्हणाले की, “प्राथमिक माहितीनुसार, ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचारासाठी आम्ही जवळच्या रुग्णालयांची मदत घेतली आहे. कर्नाटक एक्स्प्रेसने आपला पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे आणि जखमी प्रवाशांना मदत मिळाल्यानंतर लगेच पुष्पक एक्स्प्रेस देखील आपला प्रवास पुन्हा सुरू करेल”.