सतगुरुंच्या पावन सान्निध्यातं आयोजितनिरंकारी सामूहिक विवाह समारोहामध्यें 93 जोडपी विवाहबद्ध


एकमेकांचा आदर करत प्रेमपूर्वक कर्तव्यांचे पालन करावे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
पिंपरी, पुणे २७ जानेवारी, २०२५: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या ९३ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर पिंपरीच्या मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंडवरच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
नव विवाहित वधू-वरांना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी एकमेकांचा आदर-सत्कार करत प्रेमपूर्वक आणि भक्तीभावनेने कर्तव्यांचे पालन करत जीवन व्यतीत करण्याचा आशीर्वाद प्रदान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. या सामूहिक विवाह सोहळ्या मध्ये पारंपारिक जयमाला तसेच निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा- हार (सामायिक हार) प्रत्येक जोडीच्या गळ्यामध्ये मिशनच्या प्रतिनिधींमार्फत परिधान केले. त्यानंतर आदर्श गृहस्थ जीवन जगण्याची शिकवण प्रदान करणाऱ्या निरंकारी लावांचे सुमधूर गायन करण्यात आले.
समारोहामध्ये सतगुरु माताजी व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांनी वधूवरांवर पुष्प-वर्षा करुन आपला दिव्य आशीर्वाद प्रदान केला. कार्यक्रमात उपस्थित वधू-वरांशी संबंधित कुटुंबीय आणि साध संगतने देखील पुष्प-वर्षा केला, निश्चितपणे हे एक अलौकिक दृश्य होते.
आजच्या या शुभ प्रसंगी महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापुर, सोलापुर, सातारा, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर, धुळे, नासिक, नागपुर, वडसा, चिपळूण आणि खरसई इत्यादि विभिन्न ठिकाणांव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगना राज्ये आणि विदेशातून मिळून एकूण 93 जोडपी सहभागी झाली होती. सामूहिक विवाहानंतर सर्वांच्या भोजनाची उचित व्यवस्था करण्यात आली होती.
उल्लेखनीय आहे की या साध्या विवाह समारंभात अनेक पदवीधर, पदव्यूत्तर पदवीधर आणि उच्च शिक्षित वधू- वरांचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करु शकत होते. परंतु त्यांनी सतगुरुंच्या पावन छत्रछायेमध्ये त्यांच्या दिव्य शिकवणीचा अंगीकार करत साध्या पद्धतीने विवाह करुन समाजासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. निःसंदेह साध्या विवाहांचे हे अलौकिक दृश्य जाती-वर्ण इत्यादिंची विषमता दूर करुन एकत्वाचा सुंदर संदेश प्रस्तुत करत होते, जो संत निरंकारी मिशनचा संदेश देखील आहे.