“आम्ही संघात का आहोत”पुस्तकाचे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे हस्ते प्रकाशन


पुणे (प्रतिनिधी) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
समग्र विचार दर्शन आयोजित पद्मश्री रमेश पतंगे लिखीत ‘आम्ही संघात का आहोत’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजप महाराष्ट्र चे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर,पद्मश्री रमेश पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
रमेश पतंगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुस्तकामागील पार्श्वभूमी, रा स्व संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी या पुस्तकाचा केलेला पुरस्कार व संघात कार्य करीत असतांना आलेले अनुभव श्रोत्यांसमोर ठेवले.
“प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने हे पुस्तक वाचून संघविचार आचरणात आणत आपल्या भारत देशाला परमवैभव प्राप्त करवून देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे” असे विचार रविंद्र चव्हाण यांनी मांडले. “ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लिखित ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक सर्व पक्षीय आमदारांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरले आहे त्याच प्रमाणे पद्मश्री रमेश पतंगे यांचे “आम्ही संघात का आहोत” हे पुस्तक प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मार्गदर्शक ठरेल”असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
रविंद्र वंजारवाडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाजासाठी असलेले योगदान अधोरेखित करत हे पुस्तक संघ स्वयंसेवकांसह संघ जाणून घेऊ इच्छित असणाऱ्या सर्वांनी वाचावे असे प्रतिपादन या प्रसंगी केले.
समीर कुलकर्णी ह्यांनी समग्र विचार दर्शन संस्था सुरू करण्यामागची पार्श्वभूमी व संस्थेचे उद्दिष्ट अधोरेखित केले.
उमेश खंडेलवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पीयूष कश्यप ह्यांनी आभार प्रदर्शन केले.
समग्र विचार दर्शनचे अन्य संस्थापक निखिल पंचभाई , रश्मिन कुलकर्णी व पियूष कश्यप ह्यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन महामंत्री राजेश पांडे , कार्यालयीन संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अन्य मान्यवरांचे स्वागत केले.