७ ते ९ मार्च दरम्यान पुण्यात गांधी विचार साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या पुढाकाराने दि. ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान पुण्यातील गांधी भवन (कोथरूड) येथे ‘गांधी विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.गांधी विचार साहित्य संमेलनाचे प्रमुख निमंत्रक महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अभय छाजेड ,सचिव अन्वर राजन ,एड. राजेश तोंडे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत .खासदार मनोज कुमार झा यांच्या हस्ते ७ मार्च उद्घाटन होणार आहे.८,९ मार्च रोजी जावेद अख्तर सहभागी होणार आहेत ९ मार्च रोजी समारोपाला सामाजिक कार्यकर्ते हे सोनम वांगचुक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गांधीजींचे विचार आणि जीवनासंबंधी ८ परिसंवाद या संमेलनात होणार असून २५ मान्यवर त्यात मार्गदर्शन करणार आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, राम पुनियानी, तुषार गांधी, सिसिलिया कार्व्हलो हेरंब कुलकर्णी,चंद्रकांत झटाले, यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या संमेलनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत अनेक मान्यवरांचे लेख प्रकाशित होणार आहेत.
संमेलनाच्या तयारीसाठी स्वागत समिती तयार करण्यात आली असून त्यामध्ये डॉ. कुमार सप्तर्षी ,डॉ. शिवाजीराव कदम , ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त मंडळ ,प्रवीण गायकवाड, आबेदा इनामदार,माजी खासदार ॲड .वंदना चव्हाण, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य , डॉ.विश्वंभर चौधरी अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठी एड.राजेश तोंडे 9890100820,सचिन चौहान 94213 64406 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे संमेलनात मर्यादित निवास व्यवस्था असून ५०० रूपये आकारण्यात येणार आहेत.
गांधी विचार साहित्य संमेलनात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रतिनिधींच्या (जे आधी कळवतील तेवढ्याच शिबिरार्थींची) निवासाची व्यवस्था संयोजकामार्फत करण्यात आली आहे. सर्व प्रतिनिधींच्या भोजन, चहा व नाष्ट्याची निःशुल्क व्यवस्था आहे.गांधी विचाराचे साहित्य संमेलनाचे प्रतिनिधी शुल्क, वेळापत्रक इ तपशील वेळोवेळी जाहीर करण्यात येईल.

विविध पैलूंवर गांधी विचाराच्या आधाराने चर्चा

स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे गांधी, अहिंसा आणि सत्याच्या आधाराने अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या त्यांच्या प्रणालीमुळे जगभरात मान्यता पावले आहेत. भारतात विविध भाषांच्या साहित्यावर गांधी विचारांचा प्रभाव पडलेला दिसतो. मराठी साहित्यात मोजके साहित्य गांधी विचाराने प्रभावित झाले; पण प्रस्थापित ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी गांधींच्या विचाराकडे हवे तेवढे लक्ष दिले नाही. काही साहित्यिकांनी तर गांधी विचारांचा द्वेष व हेटाळणी केली. दुर्दैवाने ती द्वेष भावना आज नवीन पिढीपर्यंत पोहोचली आहे.

आजच्या काळात महात्मा गांधीच्या विचाराचे यापूर्वी कधी नव्हे, तेवढे महत्व प्राप्त झाले आहे. धर्मद्वेषाचे वातावरण हिंसाचारात रूपांतरित होत असताना दिसते. जातीच्या अभिनिवेशामुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक जात स्वतःला ‘स्वतंत्र राष्ट्र’ मानू लागली आहे. या काळात गांधीचा विचार, साहित्यात होणारे त्याचे दर्शन याचा विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटते.

मार्च मध्ये होणाऱ्या या गांधी विचार साहित्य संमेलनात समाजाच्या विविध पैलूंवर गांधी विचाराच्या आधाराने चर्चा होणार आहे. जात, धर्म, लिंग यातील स्त्री पुरूष समानता, जातीच्या वर्चस्वाचे राजकारण, हिंदु-मुस्लीम प्रश्न, युवकांच्या जगात सोशल मिडियात दिसणारे गांधी, गांधी विचारांची आजची प्रासंगिकता इ. विषयावर मान्यवर साहित्यिक आणि विचारवंत आपले विचार मांडणार आहेत.

संमेलनाध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार

प्रा. सुरेश द्वादशीवार हे ज्येष्ठ पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेली तांदळा, राजधर्म व हाकुमी,गांधीजी आणि त्यांचे टीकाकार, राजधर्म अशी अनेक पुस्तके वाचकप्रिय आहेत

.
……………………………………….
फोटो:

पत्रकार परिषदेत डावीकडून अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ कुमार सप्तर्षी, अभय छाजेड, एड. राजेश तोंडे

Latest News