स्वरश्री संगीत महोत्सवाला उत्साहात सुरुवात

नामदेव शिंदे, अंजली शिंगडे – राव, उस्ताद अर्षद अली खा यांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध

पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
स्वरश्री संगीत महोत्सवाची पहिल्या दिवसाची सुरुवात नामदेव शिंदे यांनी सादर केलेला राग पुरिया, अंजली शिंगडे – राव यांनी व्हायोलिनवर सादर केलेला राग भीमपलास आणि उस्ताद अर्षद अली यांनी राग मारू बिहागने रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाली.
स्वरश्री फाउंडेशनच्या वतीने औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे आयोजित स्वरश्री संगीत महोत्सवाचे प्रथम पुष्प नामदेव शिंदे यांनी गुंफले. त्यांनी राग पुरिया सादर केला. यामध्ये प्यार दे गर लागी हा बडा ख्याल, तर घडी ये गिनत जात, हा छोटा ख्याल सादर केला. तसेच ‘लय नाही लय नाही मागणे’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाणे गायनाची सांगता केली. रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना तबल्यावर कार्तिक स्वामी यांनी, हार्मोनियमवर गंगाधर शिंदे यांनी, पखवाज वादन गंभीर महाराज अवचार, टाळ मकरंद बादरायणी, गायन व तानपुरा साथ लक्ष्मण कोळी, विवेक गवळी व श्रेयश शिंदे यांनी केली.
द्वितीय पुष्प अंजली शिंगडे – राव यांनी गुंफले. त्यांनी व्हायोलिनवर राग भीमपलास सादर केला व बगळ्यांची माळ फुले या गाण्याने सांगता केली. रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. तबल्यावर गणेश तानवडे यांनी साथ संगत केली.
पहिल्या दिवसाची सांगता उस्ताद अर्षद अली खा यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी राग मारू बिहाग सादर करीत जागी सारी रैना, हे बडा ख्याल, तर सब लगुवा जाग रहे, हा छोटा ख्याल सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर राग केदार सादर केला व कब आओगे या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव यांनी, हार्मोनियमवर उदय कुलकर्णी यांनी, तर तानपुरा साथ शाश्वती चव्हाण व श्रावणी विरोकर यांनी केली. निवेदन आकाश थिटे यांनी केले.

Latest News