आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री कर्तुत्वशील असते – वसंत लोंढे

महात्मा फुले विद्यालयात माता पाद्यपूजा सन्मान सोहळा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. ८ मार्च २०२५) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)आई हिच सर्वांची प्रथम गुरू आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री कर्तुत्वशील असते. ती आपल्या कर्तुत्वाने माता, गुरू, बहिण, मुलगी, मैत्रीण अशा विविध भूमिका साकारत कुटुंबाच्या विकासासाठी व सन्मानासाठी समर्पण भावनेने योगदान देत असते. प्रत्येक माता या मुलांना योग्य संस्कार देण्याचे काम करतात. मुलांना कुटुंबात, समाजात कसे वागावे, बोलावे हे प्रथम आई मुलांना शिकवते. योग्य-अयोग्य गोष्टी समजावून सांगते. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्री काम करत आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने प्रत्येक मुलाने महिला दिनाच्या दिवशी आपल्या मातेची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतला पाहिजे असे मार्गदर्शन भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाचे अध्यक्ष वसंत नाना लोंढे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळ संचालित पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात “माता पालक सन्मान” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी ( दि. ८ मार्च ) विद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या आईची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले. राजमाता जिजाऊ साहेब, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव संतोष लोंढे, उपाध्यक्ष अनिल लोंढे, विश्वस्त विश्वनाथ लोंढे, सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुनील लांडगे, कामगार नेते मच्छिंद्र दरवडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब फुगे व संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य, मुख्याध्यापक मोहन वाघुले, सुलभा चव्हाण, रेखा गोडांबे आदींसह पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी सचिव संतोष लोंढे यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची माहिती दिली तसेच आरोग्य बाबत स्वच्छतेबाबत सर्वांनी दक्षता बाळगावी असे आवाहन केले. स्वागत प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक मोहन वाघुले यांनी या विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळा, बाल हक्क कक्ष, आधुनिक संगणक प्रणाली, डिजिटल डस्ट फ्री शिक्षा कक्ष, शिष्यवृत्ती परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले सभागृह, कै. नामदेवराव शंकरराव लोंढे स्मृती ग्रंथालय व त्यातील फिरते ग्रंथालय याविषयी माहिती दिली. आभार रेखा गोडांबे यांनी मानले.