निर्भय कन्या अभियानामुळे महिलांचे मनोबल वाढेल – डॉ. किर्ती धारवाडकर


एसबीपीआयएम मध्ये निर्भय कन्या अभियान संपन्न
पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. १७ मार्च २०२५) विद्यार्थिनींचा आणि समाजातील वंचित घटकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निर्भय कन्या अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले पाहिजे. यामुळे महिलांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्या सक्षम नागरिक म्हणून काम करतील, हाच निर्भय कन्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे असे एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने एसबीपीआयएम येथे “निर्भय कन्या अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ संबंध व्यवस्थापक दिपाली महाजन, सह प्रा. डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. रूपाली कुदरे आदी उपस्थित होते.पहिल्या सत्रात ‘इंट्रोडक्शन टू द वर्ल्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट- एक गुंतवणूकदार जागरूकता उपक्रम’ या विषयावर दिपाली महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यवस्थापक, व्यवस्थापकीय बँकिंग आणि राष्ट्रीय वितरण वाहिनीचा अवलंब करून विद्यार्थिनींना जीवनात स्वतंत्रता, वेळेची बचत आणि गुंतवणूक करून करिअर मध्ये स्थिरता कशी आणता येते. विद्यार्थ्यांना पैशांचे व्यवस्थापन आणि विविध आर्थिक साधनांमधील गुंतवणुकीचे महत्त्व सांगितले.दुसऱ्या सत्रात डॉ. काजल माहेश्वरी यांनी ‘वैयक्तिक सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. वैयक्तिक सुरक्षा वाढविण्यासाठी लागणारी धोरणे, स्व-संरक्षण तंत्र आणि संभाव्य धोक्यांची जाणीव विद्यार्थिनींना करून दिली. कोणत्याही परिस्थितींमध्ये सुरक्षित राहण्यासाठी काळजी कशी घ्यावी याची उदाहरणे दिली.समारोपप्रसंगी डॉ. रूपाली कुदरे यांनी ‘मानसिक आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर मानसिक आरोग्य व्यवस्थापनाचे महत्त्व, तणाव व्यवस्थापन तंत्र, जागरूकता, सकारात्मक विचार, स्वत:ची काळजी घेण्याच्या धोरणांवर मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याच्या आव्हानांना ओळखण्याच्या आणि त्यांचा सामना करण्याच्या पद्धती समजून सांगितल्या. प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी वक्त्यांना गुंतवणूक धोरणे, वैयक्तिक सुरक्षा उपाय आणि मानसिक आरोग्य व्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रश्न विचारले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उत्कृष्ट कार्यक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.