पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही सुट दिली जाणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही सुट दिली जाणार नाही. जात-धर्म न पाहता कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि कायदा-सुव्यवस्था टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. नागपुरात उसळलेल्या हिंसाचारावर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis) यांनी अधिवेशनात स्पष्ट भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, दंगलसाठी ठरवून काही भागांना टार्गेट करण्यात आले. दगडफेक करणाऱ्या जमावाकडे आधीपासून दगड जमा करून ठेवण्यात आले होते.

दंगल करणारे कोणत्याही जात-धर्माचे असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 17 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.

या आंदोलनात प्रतीकात्मक कबर जाळण्यात आली. दुपारी 3:09 वाजता गणेश पेठ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला सायंकाळी अफवा पसरली की, जाळण्यात आलेल्या कापडावर धार्मिक मजकूर होता

. यानंतर नमाज आटोपून 200-250 जणांचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी जमाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र हंसापुरी भागात मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. या हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले,

त्यात 3 डीसीपी दर्जाचे अधिकारी आहेत. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तसेच 5 नागरिक जखमी झाले असून, 2 जण अजूनही रुग्णालयात आहेत.

याचबरोबर 12 दुचाकी, 2 जेसीबी आणि अनेक चारचाकी वाहनांची जाळपोळ झाली दरम्यान, या हिंसाचारनंतर नागपूरमधील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली असून SRPFच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  गणेश पेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, पाचपावली यासह 11 भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे.