येरवडा पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा केला पर्दाफाश…


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
कल्याणीनगर येथील निवासी भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्प्रिंग ब्रुक लॉजवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी व्यवस्थापक आणि एजंटला अटक केली असून, एक तरुणीची सुटका करण्यात आली आहे. मात्र, लॉजच्या महिला मालकावर कारवाई का झाली नाही, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे
येरवडा पोलिसांना कल्याणीनगर येथील स्प्रिंग ब्रुक लॉजमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिस निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला.
या कारवाईत लॉज व्यवस्थापक अमोल तांबडे (२८, रा. श्रीरामपूर) आणि एजंट बंटी यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉजच्या खोली क्रमांक १०२ मध्ये एक २६ वर्षीय तरुणी आढळून आली. आरोपींनी तिला जबरदस्तीने व्यवसायासाठी ठेवले होते. पोलिसांनी तिची सुटका करून पुनर्वसनासाठी पाठविले आहे.
छाप्यादरम्यान गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून, लॉजच्या नोंद वहीत संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत.
पंचासमक्ष पडताळणी; बनावट ग्राहकाची मदत- कारवाईदरम्यान, पोलिसांनी दोन पंचांना बोलावून बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पुरावे गोळा केले. या ग्राहकाकडे सात हजार रुपये रोख देण्यात आले होते, जे नंतर आरोपींकडे आढळून आले. या नोटांचे क्रमांकही जुळले असून, तक्रारीत त्याचा उल्लेख आहे. अशा प्रकरणांमध्ये ‘स्पा’ किंवा लॉजचा मालकही आरोपी म्हणून धरला जातो, जरी तो घटनास्थळी नसला तरी. मात्र, या प्रकरणात लॉजच्या महिला मालकावर कारवाई करण्यात आलेली नाही.