कल्पनाशक्ती जोपासत भविष्यातील संधीचा लाभ घ्या – महेश लोटके


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, पुणे (दि. ९ एप्रिल २०२५) आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक कल्पना सुचतात, परंतु या कल्पना वास्तवात रूपांतरित होतातच असे नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव पाहता विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती जोपासत त्यातून भविष्यातील संभाव्य संधीचा लाभ घेतला पाहिजे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाने ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे, असे मत औद्योगिक ऑटोमेशन आणि व्यवसाय वृध्दीतील तज्ज्ञ महेश लोटके यांनी व्यक्त केले.पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) साते मावळ येथे ‘आयडियाथॉन २०२५’ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘कल्पनांचे वास्तवात रूपांतर करणे’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी देशभरातून एक हजार पेक्षा अधिक प्रवेशिका तर साडेतीनशे पेक्षा अधिक संघ सहभागी झाले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्यांचा विचार करून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मुक्तहस्ते केला पाहिजे, असे डॉ. मणीमाला पुरी म्हणाल्या.
दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे आपण पाहतो. याचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सुलभ वापर करून जीवन अधिक समृद्ध कसे होईल याचा विचार केला पाहिजे; याकडे डॉ. सुदीप थेपडे यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. स्पर्धेतील विजेते संघ – प्रथम क्रमांक – ड्रॅकोनिक्स- पिंपरी चिंचवड विद्यापीठ; द्वितीय – टीम कोडी – फा. कॉन्सेकाओ रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, मुंबई; तृतीय – टीम अल्निग्मा, केकेडब्ल्यू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नाशिक.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. दीपा परासर अमिटी विद्यापीठ, मुंबई, रजत जाधव वरिष्ठ अभियंता, रोबोटिक्स ऑटोमेशन, ऑटोफिना रोबोटिक्स ऑटोमेशन प्रा. लि., तळेगाव, पुणे यांनी काम पाहिले.स्पर्धेचे आयोजन डॉ. नीरू मलिक, डॉ. सागर पांडे, प्रा. अंकुश डहाट, आणि प्रा. तुषार माहोरे यांनी केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थी आणि विजयी संघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.