‘कथकाश्च परे..’ कथक नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध


पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘मुद्रा कथक नृत्यालय’ प्रस्तुत ‘कथकाश्च परे..’ या कथक नृत्याविष्काराने पुण्याच्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात रसिकांची चांगली उपस्थिती होती. हा कार्यक्रम ३ मे रोजी सायंकाळी झाला.कार्यक्रमाचे कलादिग्दर्शन ज्येष्ठ नृत्यप्रशिक्षक लीना केतकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुई केतकर, मंजिरी चिव्हाणे, शनाया पात्रावाला, फाल्गुनी नंदवाल, नूपुर कन्नाके, मैत्रेयी निर्गुण यांच्यासह इतर विद्यार्थिनींनी कथक नृत्याच्या विविध अंगांचे सादरीकरण केले. द्रुत लयीतली ताकदीची तुकडे, भावपूर्ण अभिव्यक्ती, आणि सांघिक समन्वय यामुळे सादरीकरण विशेष उठावदार ठरले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक डॉ. शारंगधर साठे आणि प्रसिद्ध लेखक-संगीतकार प्रवीण जोशी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींच्या नृत्यकलेचे कौतुक करत त्यांना उत्तेजन दिले. रश्मी राव यांनी सूत्रसंचालन केले.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा २४३ वा कार्यक्रम असून, रसिकांच्या प्रतिसादाने कार्यक्रम यशस्वी ठरला.