३० मे पासून ‘दस्तकारी हाट’ सिल्क विव्ज वस्त्र प्रदर्शन


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) देशभरातील २० राज्यांतील कुशल कारागिरांनी बनविलेल्या हस्तनिर्मित कपडे, साड्या, शाली आणि गालिचे यांचे प्रदर्शन असणारा ‘दस्तकारी हाट सिल्क विव्ज एक्स्पो’ दि. ३० मे ते ०८ जुन २०२५ दरम्यान सोनल हॉल (एरंडवणे, कर्वे रस्ता) येथे आयोजित केला जाणार आहे. हे वस्त्रप्रदर्शन दररोज सकाळी ११ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असेल. या विशेष प्रदर्शनात बनारसी सिल्क, लिनन, कॉटन आणि उत्सवी पारंपरिक परिधानांचे उत्कृष्ट प्रकार सादर केले जातील. साड्या, ड्रेस मटेरियल, सूट, कुर्ते, शाली आणि विविध प्रकारचे हस्तनिर्मित कपडे या कार्यक्रमात प्रदर्शनासाठी उपलब्ध असतील. विविध राज्यांतील पारंपरिक व आधुनिक तंत्रांचा संगम असलेली वस्त्र उत्पादने एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. भारताच्या विविध राज्यांतून आणलेल्या रेशीम आणि कॉटनच्या ७० पेक्षा अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असतील.
पारंपरिक वस्त्रांचे सौंदर्य आणि भारतीय कारागिरांच्या कौशल्याचा अनोखा अनुभव देणारे हे प्रदर्शन पुणेकरांसाठी खरेदीचा आणि सांस्कृतिक वारशाची झलक पाहण्याचा दुहेरी आनंद घेऊन येत आहे. विविध राज्यांतील रंग, डिझाईन्स आणि तंत्रांनी साकारलेले हे वस्त्रप्रदर्शन हे केवळ खरेदीची संधी नव्हे, तर एक कलात्मक उत्सव ठरणार आहे. तसेच, या निमित्ताने कारागिरांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या कलाकुसरीला प्रोत्साहन देण्याची संधीही पुणेकरांना मिळणार आहे.प्रवेश आणि पार्किंग विनामूल्य आहे.