पिंपरी चौकात आता ‘‘ त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक’’ उभारणार

पिंपरी-  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रारुप विकास आराखड्यामध्ये त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी चौकात भीमसृष्टी उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे. या परिसरात आता ‘‘रमाई आंबेडकर स्मारक’’ उभारण्यात येणार आहे

वास्तविक, सध्याच्या प्रारुप विकास योजनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पूर्वेस ‘‘म्युनसिपल पर्पज’’ तसेच उत्तरेस पोलीस स्टेशन हे आरक्षण प्रस्तावित केले आहे. ‘‘म्युनसिपल पर्पज’’ असल्यामुळे आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी ‘‘रमाई स्मारक’’ अथवा इतर नागरी सुविधांच्या दृष्टीने आरक्षणाचा विकास करता येतो.

विशेष म्हणजे, सदर पिंपरी चौक संवेदनशील असल्यामुळे गृह विभागाने मागणी केल्यानुसार डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उत्तरेस पोलीस स्टेशनचे आरक्षण प्रस्तावित केल्याचे दिसत आहे. याच ठिकाणी शहरातील बहुतांशी आंदोलने, सभा, समेलने होत असतात. त्यामुळे भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मदतीचे होणार आहे

– 1997 मध्ये मंजूर केलेल्या विकास आराखड्यामध्ये ‘‘रमाई आंबेडकर स्मारक’’ असे आरक्षण नाही. आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार, ज्या ठिकाणी ‘‘रमाई आंबेडकर स्मारक’’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी तसे आरक्षण नाही. मंजूर विकास योजनेमध्ये सर्व्हे नं. १५७ पैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकालगत वाहनतळ प्रस्तावित आहे.

त्यामुळे तांत्रिकदृष्टया या ठिकाणी रमाई आंबेडकर स्मारक उभारण्यात अडचणी येत होत्या.महाराष्ट्र प्रादेशिक योजना व नगर रचना अधिनियम, 1966 (MRTP Act, 1966) नुसार, विकास आराखड्यात विविध सार्वजनिक वापरासाठी भूखंड आरक्षित करता येतात.

पण, महामानवांची स्मारके किंवा धार्मिक स्थळे याबाबत स्वतंत्र तरतूद नाही. त्यासाठी महानगरपालिका सार्वजनिक वापरासाठी ‘‘म्युनसिपल पर्पज’’ अशा आशयाने आरक्षण प्रस्तावित केले जाते.

त्याठिकाणी आवश्यकतेनुसार, महानगरपालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करुन अपेक्षीत विकास करु शकते

.

माता रमाई स्मारकाच्या उभारणीसाठी आजवर अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलने, उपोषणे केली आहेत. पण, मंजुर डीपीमध्ये माता रमाई स्मारक नावाने कोणतेही आरक्षण प्रस्तावित नव्हते. तथापि पूर्वी असलेले वाहनतळ / बस डेपोचे आरक्षण रद्द करुन त्या ठिकाणी रमाई स्मारक उभारणे कायदेशीर दृष्ट्या किचकट होते.

त्यामुळेच सदरचे स्मारक अद्याप विकसित झाले नाही. तथापि, आता प्रारुप विकास योजनेत सदर आरक्षणाच्या नावात बदल करुन ‘‘म्युनसिपल पर्पज’’ असे नाव दिले आहे

. त्यामुळे रमाई स्मारकाचा मार्ग एकप्रकारे मोकळा झाला आहे. ‘‘म्युनसिपल पर्पज’’ याचा दुसरा अर्थ असा होती की, महानगरपालिका सर्वसाधारण सभेत ठराव घेवून त्या ठिकाणी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अंतिम निर्णय घेवून त्या ठिकाणी योग्य तो विकास करु शकते.

त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या आरक्षणावरुन राजकीय हेतुने ‘‘फेक नॅरेटिव्ह’’ पसरवण्याचा प्रयत्न सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे. ‘‘प्रस्तावित स्मारकाचे आरक्षण पूर्वीच्या डीपीमध्ये होते. मात्र, प्रारुप डीपीमध्ये रद्द करण्यात आले.’’ असा दावा केला जातो. त्याद्वारे आंबेडकरी अनुयायींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. जुना डीपी आणि प्रारुप डीपी याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास प्रारुप डीपीमध्ये असलेले ‘’म्युनसिपल पर्पज’’ हे आरक्षण माता रमाई यांचे बहुप्रतिक्षीत स्मारक उभारणीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. स्मारक उभारणीतील तांत्रिक अडथळा दूर झाला असून, त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी अशा ‘‘फेक नॅरेटिव्ह’ला बळी पडू नये, असे आवाहन ‘‘महाईन्यूज’’ च्या वतीने करीत आहोत.

पूर्वी वाहनतळाचे आरक्षण कमी करुन उत्तरेला सरकवण्यात आले आहे. चौकात होणारी गर्दी, महापालिका भवन, पुणे-मुंबई महामार्ग या सर्वाचा विचार करुन बस टर्मिनसचे आरक्षणसुद्धा कायम ठेवले आहे. सदर स्मारकाला तीन बाजुंनी रस्ते असल्यामुळे सदरचे स्मारक मुंबई-पुणे महामार्गावरुन स्पष्ट दिसेल. त्यामुळे भव्य स्मारक उभारण्याचे पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्न आता दृष्टीक्षेपात आले आहे